उगवतीचे रंग – एका अथक जिद्दीचा प्रवास : राहुल देशमुख

उगवतीचे रंग – एका अथक जिद्दीचा प्रवास : राहुल देशमुख Rising Colors – The Journey of a Tireless Perseverance: Rahul Deshmukh

दिमाखदार असा झी अनन्य पुरस्कार सोहळा सुरू होता. सन्मानाचे असे झी अनन्य पुरस्कार दिले जा त होते.या कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते. महाराष्ट्र राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होत होते.अचानक पुणे येथील राहुल देशमुख यांच्या नावाची निवेदकांनी घोषणा केली आणि सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अंध असलेले राहुल देशमुख यांना त्यांची सहचारिणी हात धरून व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी घेऊन आली .

कोण हे राहुल देशमुख ? आणि कशासाठी त्यांचा गौरव झी अनन्य सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला ?

या ध्येयवादी तरुणाचे नाव आहे राहुल देशमुख. आज अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी, संस्थांनी गौरविलेले हे व्यक्तिमत्व सुखासुखी या अवस्थेपर्यंत पोहोचलेले नाही. त्याच्यामागे आहेत अपरंपार कष्ट, ध्येयनिष्ठा आणि कितीही संकटे आली तरी आपल्या ध्येयापासून अविचल राहण्याची दुर्दम्य इच्छा. 

इंग्रजीत एक म्हण आहे 'Life is not a bed of roses'. 'जीवन म्हणजे गुलाबाची मऊ शय्या नव्हे'. कदाचित जीवनाच्या वाटेवर काटेच जास्त असावेत . असे हे काटेरी अडथळे पार करून जो पुढे जातो तो जीवनात काहीतरी करून दाखवू शकतो. पण जो या अडथळ्यांपाशी अडखळतो आणि पराजित वृत्तीने पुढची वाटचाल करणे नाकारतो, तो तिथेच राहतो.यशाची दारे त्याच्यासाठी बंदच राहतात. पण जो या अडथळ्यांनाच आपले पाय रोवण्याचे साधन मानतो, त्याचा पुढचा मार्ग नियती सुकर करते. यशाची दारे त्याच्यासाठी खुली होतात. असे म्हणतात ना की गॉड हेल्प्स देम, हू हेल्प देमसेलव्ह्स. अशाच राहुल देशमुख नावाच्या एका व्यक्तिमत्वाच्या अथक जिद्दीचा प्रवास -

म्हणूनच पुढे चालून त्याने स्वतःच्या दृष्टिहीनतेवर मात करून इतरांसाठी कार्य केले

   नगर जिल्ह्यातील शिर्डी जवळचं एकरुखे हे राहुलचं छोटसं गाव. राहुलच्या लहानपणापासूनच अडथळ्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली. वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षांपासून त्याची दृष्टी जायला सुरुवात झाली. सैन्यातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांना आपल्या मुलासाठी काय वाटेल ते झाले तरी चालेल पण त्याला त्याची दृष्टी परत मिळाली पाहिजे असे वाटणे साहजिकच होते.या भावनेतूनच त्यांनी मुंबई, पुणे येथील नामांकित डॉक्टरांना राहुलला दाखवले. डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या केल्या. बरेचदा त्यासाठीही पैसे नसायचे. अशावेळी शेजाऱ्यांकडून पैसे उसने घेऊन उपचार, प्रवास करावा लागायचा. त्यांनी अगदी परदेशातील डॉक्टरांशी सुद्धा दृष्टी परत यावी या आशेने संपर्क साधला पण दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नाला यश मिळू शकले नाही. कदाचित नियतीचा वेगळा हेतू असावा. म्हणूनच पुढे चालून त्याने स्वतःच्या दृष्टिहीनतेवर मात करून इतरांसाठी कार्य केले. 

      राहुलच्या काही शिक्षकांच्या सल्ल्यानुसार त्याच्या वडिलांनी मग तिसरीपासून पुण्याच्या कोरेगाव पार्क येथे असलेल्या अंधशाळेत दाखल केले. या शाळेत राहुलला अनेक चांगले शिक्षक मिळाले. त्यात विजया लवाटे नावाच्या शिक्षिका होत्या. त्यांनी राहुलला अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शनही केले. या वक्तृत्व, निबंध इ स्पर्धांमध्ये राहुलचा नेहमीच पहिला दुसरा क्रमांक असायचा. या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचा फायदा राहुलला पुढच्या आयुष्यात खूप झाला. याच शाळेत इतरही अनेक मान्यवर लोक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यायचे. अशा लोकांशी राहुल इतर मुले निघून गेल्यानंतर चर्चा करायचा. मिळतील तिथून ज्ञानाचे कण गोळा करण्याची त्याची तयारी असायची. पुढे साधारण स्वतः प्रवास करण्याइतका मोठा झाल्यानंतर राहुल सुटीत मुंबईला जात असे आणि तिथून अभ्यासाच्या, अवांतर वाचनाच्या दृष्टीने ज्या काही कॅसेट्स मिळतील त्या घेऊन यायच्या आणि ऐकायच्या अशी त्याची सवय होती. त्यामुळे त्याचे ज्ञान अद्ययावत होत गेले.स्वामी विवेकानंद,स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आदी बद्दल तो वाचत, ऐकत गेला. या सगळ्या व्यक्तिमत्वांबद्दल अभ्यास करत असताना शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाने तो प्रभावित झाला. तो बहुश्रुत होत गेला.  त्याचे अथक प्रयत्न आणि बुद्धीची साथ यामुळे जरी दहावीला तो गुणवत्ता यादीत येऊ शकला नाही तरी गुण मात्र उत्तम मिळाले आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पण इथूनच त्याच्या संकटाना सुद्धा सुरुवात झाली. शाळेत तो सुरक्षित होता. शाळेत असताना ज्या सोयीसुविधा मिळाल्या, त्या कॉलेजमध्ये शिकताना कुठेही मिळणार नव्हत्या. आता सगळ्या गोष्टी स्वतःच्याच जबाबदारीवर कराव्या लागणार होत्या. 

अंध असल्यामुळे त्याला अनेक वसतिगृहात प्रवेश नाकारला गेला. याच कारणामुळे कोणी भाड्याने सुद्धा खोली द्यायला तयार नव्हते. राहण्याचा मोठा प्रश्न होता. शिक्षण तर करायचे, गावी परत जायचं नाही हा निर्धार होता. या पट्ठ्याने हार मानली नाही.अनेक रात्री त्याने रेल्वे प्लॅटफॉर्मवर काढल्या. त्यातूनही बऱ्याचदा पोलीस हाकलून द्यायचे. त्यातूनच त्याला असे लक्षात आले की अशी आपल्यासारखी अनेक मुले आहेत की ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे पण राहायला जागा नाही. मग त्याच्या मनात आले की आपणच का अशी सोय बेघर असणाऱ्या सगळ्यांसाठी का करू नये ? एकीकडे शिक्षण सुरु असताना दुसरीकडे आपल्यासारख्याच इतर अंधांसाठी अशा प्रकारची सोय करावी असे विचार त्याच्या मनात येत होते. पण मग १२ वीच्या अभ्यासाकडेही लक्ष केंद्रित करणे महत्वाचे होते. त्यामुळे आधी बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायचे असे त्याने ठरवले.

वर्गातील मित्रमैत्रिणींनी एव्हाना एक हुशार, मनमिळाऊ आणि सुस्वभावी राहुलने कधीच आपलेसे केले होते

  आतापर्यंत राहुलला एक अंध व्यक्ती समजून दुर्लक्ष करणाऱ्या वर्गातील मित्रमैत्रिणींनी एव्हाना एक हुशार, मनमिळाऊ आणि सुस्वभावी राहुलने कधीच आपलेसे केले होते. ते अभ्यासाच्या दृष्टीने वेळोवेळी राहुलला मदत करीत. एकदा वाचून दाखवलेले त्याच्या लक्षात राहत असे. राहुलच्या या गुणांचा कॉलेजमधील प्राध्यापकांवर सुद्धा प्रभाव पडला आणि तो काहीतरी वेगळे करून दाखवण्याची क्षमता असलेला विद्यार्थी आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्रिशीला गायकवाड म्हणून शिक्षिका इंग्रजी शिकवायच्या. प्रमिला पाटील म्हणून शिक्षिका राज्यशास्त्र शिकवायच्या. या दोघीनी त्यांच्या कॉलेजमधील शिकवण्याव्यतिरिक्त अधिकचा वेळ राहुलसाठी दिला. कधी त्याला आपल्या घरी त्यासाठी बोलावले. स्वतःच्या आवाजात नोट्स रेकॉर्ड करून दिल्या. या सगळ्या प्राध्यापक, विद्यार्थी यांचे सहकार्य आणि स्वतः राहुलची अभ्यासासाठीची धडपड या सगळ्या गोष्टींमुळे राहुलला बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येता आले. त्याचा गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक आला होता. आपल्याकडे काही करण्याची जिद्द असली आणि त्याला प्रयत्नांची जोड दिली तर यश मिळवणे अवघड नाही हे राहुलने आपल्या प्रयत्नाने सिद्ध केले. 

 बारावीनंतर आपण काहीतरी इतरांसाठी करावं अशी धडपड सुरु झाली. अंधांसाठी एखादी संस्था सुरु करावी याचा ध्यास होता. अंधांना स्वावलंबी बनवावं,त्यांना संगणक प्रशिक्षण द्यावं असं त्याच्या मनाने घेतलं.१९९९ पासून केलेल्या त्याच्या अथक परिश्रमातून ही संस्था सुरू व्हायला २००८ साल उजाडले.तेव्हापासून म्हणजे जवळपास २१ वर्षांपासून जिद्दीचा हा अथक प्रवास सुरु आहे. आणि आज या अंध अपंगांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (NAWPC) या आगळ्या वेगळ्या संस्थेची वाटचाल उत्तम प्रकारे सुरू आहे.

 पण संस्थेचं कामकाज नेटानं सुरु ठेवणं आणि त्याचबरोबर स्वतःची शैक्षणिक प्रगती साधणं ही राहुलसाठी तारेवरची कसरत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यानं मिळवलेलं यश हे अक्षरशः स्तिमित करणारं होतं . त्याने मिळवलेले यश फक्त अंध-अपंगांच्या राखीव वर्गातील नव्हते तर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच ओपन मेरिट लिस्ट मध्ये त्याने मिळवलेले होते हे आवर्जून नमूद करण्यासारखे आहे. जरा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीकडे नजर टाकली तर आपल्याला हे सहज लक्षात येईल. बारावीत गुणवत्ता यादीत पुणे बोर्डात तेरावा क्रमांक, बीए च्या परीक्षेत पुणे विद्यापीठात चौथा क्रमांक, एमए मध्ये समाजशास्त्र विषयात पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक, एमए राज्यशास्त्र मध्ये पुणे विद्यापीठात पाचवा क्रमांक. हे त्याचे यश त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यास पुरेसे आहे. स्वतः डोळस असतानाही परीक्षेसाठी गैरमार्गांचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राहुलचा आदर्श घ्यावा असे त्याचे उदाहरण आहे. याचबरोबर बी एड ,एमएसडब्ल्यू अशा अनेक पदव्या आणि संगणकाशी संबंधित अनेक कोर्सेस राहुलने यशस्वीरीत्या पूर्ण केले. बारावीत मेरिटमध्ये आल्यानंतर ' मैत्री निबंधाशी ' ही ५ वी ते ६ वी साठी आणि ८ वी ते १२ वी साठी अशी दोन पुस्तके त्याने विद्यार्थ्यांच्या मागणीवरून लिहिली. या पुस्तकांना ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा.ग.प्र.प्रधान यांची प्रस्तावना लाभली आहे. - (भाग दोन उद्या )/ विश्वास देशपांडे, चाळीसगाव

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: