सोरतापवाडीतील दीप्ती मगर-चौधरी संशयास्पद मृत्यू प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन; सखोल तपासाची मागणी

सोरतापवाडीतील दीप्ती मगर-चौधरी संशयास्पद मृत्यू प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन; सखोल तपासाची मागणी

सोरतापवाडीतील दीप्ती मगर-चौधरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सखोल तपास व कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पुणे |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ जानेवारी २०२६ : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील सोरतापवाडी ता.हवेली येथील अभियंता दीप्ती मगर-चौधरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना सखोल तपास व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.
या प्रकरणात हुंडा,शारीरिक व मानसिक छळ तसेच बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि सक्तीच्या गर्भपाताचा गंभीर संशय असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. हे प्रकरण पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचा गंभीर भंग असल्याचे सांगत, हा तपास विशेष केस म्हणून हाताळावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.

पुरावे नष्ट होण्याची शक्यता : तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे की,या प्रकरणात पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवून तांत्रिक पुरावे कॉल डिटेल्स, वैद्यकीय अहवाल, डिजिटल पुरावे यावर विशेष भर द्यावा.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

हुंडा व छळ प्रकरणात अर्नेशकुमार निकालाचा गैरवापर टाळावा

या घटनेत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या शारीरिक व मानसिक छळाचे तसेच हुंड्याच्या मागणीचे पुरावे समोर येत असल्याचे सांगत,अशा संवेदनशील प्रकरणांत आरोपींना अर्नेशकुमार निकालाचा आधार घेऊन पळवाट मिळू नये, यासाठी ठोस व पुराव्यानिशी तपास करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

PCPNDT कायद्याअंतर्गत डॉक्टर व केंद्रांची चौकशी

या प्रकरणात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी व सक्तीच्या गर्भपाताचा संशय व्यक्त होत असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या डॉक्टर,रुग्णालये किंवा तपासणी केंद्रांचा शोध घेऊन त्यांना सह- आरोपी करावे,अशी स्पष्ट मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

पीडित कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

पीडितेच्या माहेरच्या व्यक्तींना धमकावले जात असल्यास, त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच तपासा दरम्यान त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

दोषारोपपत्र लवकर सादर करण्याची सूचना

दीप्ती मगर-चौधरी मृत्यू प्रकरणाचा तपास विशेष केस म्हणून हाताळून दोषारोपपत्र (चार्जशीट) लवकरात लवकर आणि त्रुटीमुक्त सादर करण्यात यावे, जेणेकरून दोषींवर कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी अपेक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Back To Top