गहू व हरभरा बियाण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा
गहू व हरभरा बियाण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा Farmers should apply online for wheat and gram seeds till September 25
सोलापूर /शेळवे ,संभाजी वाघुले : गहू व हरभरा बियाणासाठी रब्बी हंगामात महाडीबीटी पोर्टलवर ‘एक अर्ज योजना अनेक’ या सदराखाली शेतकऱ्यांनी 25 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर.शिंदे यांनी केले आहे.
बियाणे व लागवड साहित्य उपअभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम रब्बी हंगाम 2021-22 साठी लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्यात येणार आहे . ही योजना तीन वर्षासाठी असून प्रथम वर्षी तृतीयांश गावे निवड करावयाची आहेत. पुढील तीन वर्षात संपूर्ण तालुक्यातील सर्व गावामध्ये ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबवायचा आहे. शेतकऱ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. या पध्दतीने निवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यास एक एकर क्षेत्र मर्यादेत निवड केलेल्या गावालगत अधिकृत विक्रेत्या मार्फत संबंधित पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानित दराने वितरण करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडील maha DBT farmer मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे. सुविधा ही वापरकर्ता आय.डी. व आधार क्रमांक आधारित असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन कागदपत्रे अपलोड करावी. यासाठी जवळच्या सामुहिक सेवा केंद्र, कृषी कार्यालये येथे मदत घेता येऊ शकते. अर्ज भरताना कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी [email protected] या ईमेलवर अथवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले आहे.