नारायण चिंचोली व भैरवनाथवाडी येथे एसटी बस थांबा द्या; ग्राम प्रशासनाची पंढरपूर आगार प्रमुखांकडे मागणी
सूर्यनारायण मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय; बस थांबा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
Pandhapur narayan chincholi news : पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१३/०६/२०२६ : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली व भैरवनाथवाडी येथे एसटी बसचा नियमित थांबा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राम प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सरपंच सौ.नर्मदा लक्ष्मण धनवडे यांनी पंढरपूर एसटी आगार प्रमुखांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
नारायण चिंचोली येथे प्राचीन व दुर्मिळ असे हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिर असून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. महाराष्ट्रातील एकमेव सूर्यनारायण मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी जिल्ह्यासह राज्यभरातून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, नारायण चिंचोली व भैरवनाथवाडी येथे पुरेसा एसटी बस थांबा नसल्यामुळे भाविक व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बसची प्रतीक्षा करताना अनेकांना तासन्तास थांबावे लागत असून, अनेक वेळा खासगी वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर आगारांतर्गत धावणाऱ्या सर्व एसटी बसेसना या दोन्ही ठिकाणी नियमित थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरपंच नर्मदा धनवडे यांनी दिलेल्या निवेदनात मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामस्थ व भाविकांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण धनवडे, ग्रामसेवक संतोष गायकवाड,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य बापूराव कोले,सुनील माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीची दखल घेणार
नारायण चिंचोली येथे बस थांब्याबाबत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नर्मदा धनवडे यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. पंढरपूर आगारांतर्गत धावणाऱ्या सर्व बसेसना थांबा देण्याबाबत लेखी सूचना दिल्या जातील. तसेच सांगोला व अकलूज आगाराच्या बसेसना नारायण चिंचोली व भैरवनाथवाडी येथे थांबा देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. ग्रामस्थ व भाविकांच्या प्रवासाची सोय होण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल
– अंकुश सलगर स्थानक प्रमुख, पंढरपूर आगार

