अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धीत भव्य महाआरोग्य शिबिर; हजारो नागरिकांनी घेतला लाभ
अण्णांनी शतक पूर्ण करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा,मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत आरोग्यसेवेचा मोठा उपक्रम
राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा देत अण्णांनी शतकी आयुष्य पूर्ण करावे अशी सदिच्छा व्यक्त केली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्यदूत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात हजारो नागरिकांनी मोफत आरोग्यसेवांचा लाभ घेतला.
राळेगणसिद्धी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १४ जून : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सुमारे एक हजार नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येणाऱ्या जनहिताच्या आरोग्य उपक्रमांचा भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरात जनरल तपासणी, हृदयरोग तपासणी,ईसीजी,रक्तदाब व मधुमेह तपासणी,मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, सांधेदुखी व गुडघेदुखी तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी तसेच ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिकचे वितरण करण्यात आले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.अण्णा,तुम्हाला आता शतक पूर्ण करायचे आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळे राज्याची प्रगती योग्य दिशेने होत आहे. समाजासाठी केलेले तुमचे कार्य प्रेरणादायी असून पुढील अनेक वर्षे आम्हाला तुमचे मार्गदर्शन लाभावे, अशा शब्दांत त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
अण्णा हजारे यांनीही या शुभेच्छांचा स्वीकार करत,तुमच्या शुभेच्छांमुळे मी नक्कीच सेंच्युरी पूर्ण करेन,असा विश्वास व्यक्त केला. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराबद्दल आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आभार मानले.

दोन दिवसीय भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून सहभागी प्रत्येक रक्तदात्यास पाच लाख रुपयांचे मोफत अपघाती विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,विविध रुग्णालयांचे नामांकित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, अण्णा हजारे यांचे सहकारी तसेच राळेगणसिद्धी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णसेवा,जनजागृती आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये विशेष ठरला.

