सरकारला कोरिडोरफोबिया झाला आहे का ? पंढरपूरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष- अभयसिंह कुलकर्णी
कोरिडोरच्या घाईपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या; मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात प्रत्यक्ष पाहणी करावी
पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ जून २०२६: राज्यातील विविध गंभीर प्रश्न प्रलंबित असताना सरकारने पंढरपूर कोरिडोर प्रकल्पालाच सर्वोच्च प्राधान्य दिल्याचा आरोप हिंदू महासभा नेते व पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी (इचगांवकर) यांनी केला आहे.सरकारला कोरिडोरफोबिया झाला आहे का ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
अभयसिंह कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही दिवसांपासून राज्यासमोर अनेक जटिल प्रश्न उभे आहेत मात्र त्यांचे निराकरण करण्याऐवजी शासनाकडून पंढरपूर कोरिडोरच्या घोषणांवर भर दिला जात आहे. अधिक महिन्यात लाखो भाविक पंढरपूरात दाखल झाले असताना वाहतूक कोंडी, अतिक्रमणे,दर्शनबारीतील गैरसोयी आणि चंद्रभागा नदीतील दुर्घटनांवर प्रभावी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यावर संभाव्य दुष्काळाचे संकट घोंगावत असताना कोरिडोर प्रकल्पाची एवढी घाई का केली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.आणखी काही वर्षे कोरिडोर झाला नाही तरी चालेल, परंतु शेतकरी,नागरिक आणि भाविकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण होणे अधिक महत्त्वाचे आहे,असे ते म्हणाले.
मंदिर समितीच्या कारभारावरही त्यांनी टीका केली. यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एमटीडीसी भक्तनिवासाच्या जागा आणि इमारती विनावापर पडून असल्याचा दावा त्यांनी केला.तसेच गोशाळा आणि इतर योजनांच्या नावाखाली अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यामागील धोरणावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
समृद्धी महामार्गाच्या पाहणी प्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात प्रत्यक्ष आठ ते दहा तास फिरून परिस्थितीचा आढावा घ्यावा त्यानंतरच कोरिडोरसाठी योग्य जागांचा निर्णय घ्यावा,असे आवाहन अभयसिंह कुलकर्णी यांनी केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर पंढरपूर कोरिडोर प्रकल्पाविषयीची चर्चा पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

