जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत तरी कोण?


Edited by | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 30, 2021, 4:02 PM

जपानमधील लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नवे नेते म्हणून किशिदा यांची सोमवारी संसदेत पुढील पंतप्रधान म्हणून निवड होणार आहे. मावळते पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना करोना परिस्थिती हाताळणीवर टीका झाली होती. वर्षभरातच सुगा यांना पदभार सोडावा लागला आहे.

 

टोकियो: जपानचे माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक जिंकली आहे. यामुळे पंतप्रधान होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर, किशिदा यांना साथीच्या रोगाने उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि वाढत्या प्रादेशिक सुरक्षेच्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी अमेरिकेसोबत दृढ संबंध निर्माण करण्याचे आव्हान असेल.

किशिदा हे पक्षाचे नेते आणि मावळते पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची जागा घेतील. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर केवळ एक वर्षानंतरच सुगा यांना पद सोडावे लागत आहे.

PM मोदींचे कौतुक करणारी बातमी व्हायरल; ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले…
लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नवे नेते म्हणून किशिदा यांची सोमवारी संसदेत पुढील पंतप्रधान म्हणून निवड होणार आहे. किशिदा यांनी पक्षनेते पदाच्या शर्यतीत लोकप्रिय लसीकरणमंत्री तारो कोनो यांचा पराभव केला. पहिल्या टप्प्यात त्यांनी सना ताकाची आणि सेको नोडा या दोन महिला उमेदवारांचा पराभव केला होता. सुगा यांच्या नेतृत्वाखाली खराब झालेली पक्षाची प्रतिमा सुधारण्याची जाबाबदारी किशिदा यांच्यावर आहे.

न्यूझीलँडमधील भारतीय प्राध्यापकाला हिंदुत्ववाद्यांकडून धमकी; पोलिसांनी सुरक्षा वाढवली
कोण आहेत फुमियो किशिदा?

जपानमधील हिरोशिमा येथील राजकीय घराण्यातून येणारे ६४ वर्षीय फुमिओ किशिदा यांची पंतप्रधानपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा दीर्घ काळापासून होती. योशिहिदे सुगा यांच्याकडून २०२०मध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर वर्षभर पंतप्रधान राहिल्यानंतर सुगा आता पायउतार होणार आहेत. किशिदा यांनी यापूर्वी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे (एलडीपी) धोरण प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय २०१२ ते २०१७ या काळात ते जपानचे परराष्ट्रमंत्री होते. त्या कार्यकाळात त्यांनी जपानचे संबंध नेहमीच थंड राहिलेल्या रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांसोबत वाटाघाटी केल्या होत्या. अण्वस्त्रे नष्ट करणे माझ्या जीवनाचे कार्य असल्याचे किशिदा यांनी यापूर्वी सांगितले आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना २०१६ मध्ये किशिदा यांनी हिरोशिमा भेटीवर आणले होते. ही भेट ऐतिहासिक ठरली होती. आपले वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून किशिदा यांनी १९९३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. पूर्वी त्यांनी बँकेतही काम केले आहे.

कॅनडातील कौलाचा अर्थ
हिरोशिमा कार्प बेसबॉलचे किशिदा मोठे फॅन आहेत. शाळेत असताना ते बेसबॉलपटू होते. टोकियो विद्यापीठात कायद्याच्या प्रवेश परीक्षेत ते तीन वेळा नापास झाले होते. टोकियोतील वासेदा या खासगी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. किशिदा यांना तीन अपत्ये आहेत. ऐकण्याच्या कौशल्यासाठी किशिदा ओळखले जातात. जपानच्या जनतेला उदार राजकारण हवे आहे, असे त्यांनी सांगितले. किशिदा यांनी जनतेकडून सूचना मागवल्या असून, जाहीर कार्यक्रमांत ते एक वही सोबत बाळगतात. या वहीत लोकांनी सुचवलेल्या कल्पना ते नोंदवत असतात. मात्र, त्यांच्या लोकसंपर्कात सातत्य आढळून आलेले नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: