चेन्नईच्या पराभवाची हॅटट्रिक, केएल राहुलने गोलंदाजांची धुलाई
विजयासाठी १३५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जला कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी स्फोटक सुरुवात करुन दिली. या दोघांनी ४.२ षटकात ४३ धावा केल्या होत्या. पाचव्या षटकात शार्दूल ठाकूरने मयांकला १२ धावांवर तर अखेरच्या चेंडूवर सरफराज खानला शून्यावर बाद करून पंजाबला दोन धक्के दिले. त्यानंतर दीपक चाहरने धोकादायक शाहरुख खानला ८ धावांवर माघारी पाठवले आणि पंजाबला तिसरा धक्का दिला. दरम्यान दुसऱ्या बाजूला राहुलकडून गोलंदाजांची धुलाई सुरूच होती. त्याने २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. राहुलच्या जोरदार फटकेबाजीमुळे पंजाबने सहज विजय मिळवला. पंजाबने चेन्नईने दिलेले विजयाचे लक्ष्य १३ षटकार पार केले. चेन्नईकडून शार्दूलने २ विकेट घेतल्या. केएल राहुलने फक्त ४२ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ९८ धावा केल्या.
वाचा- मी राजीनामा देतोय, टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघासोबत असणार नाही
त्याआधी पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड १२ धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ मोईन अली शून्यावर, उथप्पा २, रायडू ४ तर कर्णधार धोनी १५ धावांवर माघारी परतले. यामुळे चेन्नईची अवस्था ५ बाद ६१ अशी झाली होती. मैदानात असलेल्या फाफ डुप्लेसिस आणि रविंद्र जडेजा यांनी चेन्नईला शतकाच्या पुढे नेले. फाफने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावा केल्या. रविंद्र जडेजा १५ धावांवर नाबाद तर ड्वेन ब्रावो ४ धावांवर नाबाद राहिला. पंजाबकडून अर्शदिप सिंग आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.