सन 2020 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता द्यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Mumbai mahanagarpalika election: Ramdas athawale
मुंबई महापालिका निवडणुकीत रामदास आठवले यांच्या प्रचारसभांचा झंझावात
मुंबईच्या जडणघडणीत रिपब्लिकन चळवळीचे मोठे योगदान– रामदास आठवले
सन 2020 पर्यंत उभारलेल्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देणारा कायदा राज्य सरकारने करावा, अशी ठाम मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईतील प्रचारसभांमध्ये केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रचारसभांचा झंझावात सुरू झाला आहे.
Mumbai mahanagarpalika election: मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज– श्रमिक,कष्टकरी, दलित, झोपडपट्टीवासी तसेच बहुजन गरीब सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकरी व रिपब्लिकन चळवळीचे मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.सन 2020 पर्यंत उभारलेल्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देणारा कायदा राज्य सरकारने करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रिपब्लिकन पक्षाचे 12 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवत असून, त्यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले स्वतः मैदानात उतरले आहेत. आजपासून त्यांच्या प्रचारसभांचा झंझावात सुरू झाला आहे.
मालाड पूर्व कुरार येथील जयभीमनगर, वॉर्ड क्रमांक 38 मधील रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. वंदना संजय बोराडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना आठवले म्हणाले की, 1995 नंतरच्या झोपड्या अनधिकृत ठरवून निष्कासित केल्या जात असताना रिपब्लिकन पक्ष झोपडपट्टीवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. 2011 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देणारा कायदा रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनामुळेच झाला, असे त्यांनी सांगितले.
आता 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या नागरिकांच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासाठी 2020 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर अंधेरी पश्चिम,नवरंग सिनेमा जवळ वॉर्ड क्रमांक 65 येथील उमेदवार जयंतीलाल गडा यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच धारावी वॉर्ड क्रमांक 186 मधील उमेदवार कुमारी स्नेहा सिद्धार्थ कासारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांना रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढील प्रचार दौरा
दि. 7 जानेवारी रोजी मुलुंड वॉर्ड क्रमांक 104 मधील उमेदवार विनोद जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा, घाटकोपर पूर्व वॉर्ड क्रमांक 125 मधील उमेदवार राजा गांगुर्डे यांच्या प्रचार सभेला संबोधन तसेच कोरबा मिठागर,वडाळा येथे प्रचार सभा होणार आहे.
महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला जागा न मिळाल्या तरी रामदास आठवले हे महायुतीचे सेनापती बनून राज्यभर झंझावाती प्रचार करत आहेत, असे चित्र सध्या दिसून येत आहे.