राजकीय किंमत चुकवावी लागली तरी…; वरुण गांधींचं अभिनंदन करत शिवसेनेची भाजपवर टीका


हायलाइट्स:

  • आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक
  • बंदमध्ये सहभागी होण्याचे आघाडीकडून आवाहन
  • शिवसेनेकडून वरुण गांधींचे अभिनंदन

मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला? असा सवाल करतच भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली, अशा शब्दांत शिवसेनेने भाजप खासदार वरुण गांधी यांचं कौतुक करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. तसंच, भाजपवर सडकून टीका केली आहे.

‘वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली. लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हिंदू विरुद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असाही आरोप वरुण गांधी यांनी आता केला आहे. तसे असेल तर ते गंभीर आहे. हिंदू आणि शीख एकच आहेत. त्यांच्यात फूट पाडण्याचा आणि देशाच्या धार्मिक-राष्ट्रीय सलोख्याला चूड लावण्याचा प्रयत्न देशाला आता परवडणारा नाही,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Maharashtra Bandh: आज ‘महाराष्ट्र बंद’; कोणत्या जिल्ह्यात, काय स्थिती?

‘वरुण गांधी हेसुद्धा इंदिरा गांधींचे नातू व संजय गांधींचे पुत्र आहेत. लखीमपूर खेरीचा भयंकर प्रकार पाहून त्यांचे रक्त तापले व त्यांनी मत व्यक्त केले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे काय? शेतकऱ्यांच्या हत्या, त्यांच्या रक्ताचे पाट पाहून सत्ताधारी मंडळींचे रक्त थंडच पडले असेल तर देशाला वाचविण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल,’ असं शिवसेनेने म्हटलं आहे.

‘वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले? वरुण गांधी हे धाडसाने बोलले. इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील. लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करू शकले नाहीत, अशा सगळ्यांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे,’ असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे.

वाचाः
महाराष्ट्र बंद : व्यापाऱ्यांचा विरोध; मुंबईतील डबेवाल्यांकडून मात्र जाहीर पाठिंबाSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: