Jammu Kashmir: बांदीपोरा, अनंतनागमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
हायलाइट्स:
- बांदीपोरा भागात एक दहशतवादी ठार
- अनंतनागमध्येही एका दहशतवाद्याला कंठस्नान
- राष्ट्रीय अन्वेषण विभागाकडून जम्मू-काश्मीरमध्ये १५ हून अधिक ठिकाणी छापे
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात सोमवारी पहाटेच झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचं समोर येतंय. इतर दहशतवाद्यांच्या शोधार्थ अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेला दहशतवादी ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहे. या दहशतवाद्याचं नाव इम्तियाज अहमद डार असल्याचं समोर आलंय. नुकत्याच, शाहगुंड भागात सुमो वाहनचालकाच्या हत्येत हा दहशतवादी सहभागी होता.
रविवारीदेखील बांदीपोरा भागात चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून अटक करण्यात आली होती. हे चारही दहशतवादी शाहगुंडमध्ये निष्पाप नागरिकांच्या हत्येत सहभागी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचवा दहशतवादी अद्याप फरार आहे.
अनंतनागमध्येही एक दहशतवादी ठार
दुसरीकडे, अनंतनागमध्येही एक दहशतवाद्याला ठार करण्यात आलंय. खगुंड वेरिनाग भागात ही चकमक झाली. सुरक्षा रक्षकांना मृत दहशतवाद्याजवळ एक पिस्तूल आणि एक ग्रेनेड आढळून आलं आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षादलानं संयुक्तरित्या ही मोहीम फत्ते केली.
एनआयएकडून छापेमारी
राष्ट्रीय अन्वेषण विभागानं (NIA) रविवारी जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर, सोपोर आणि अनंतनाग भागात १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. या दरम्यान ‘द रेसिस्टंट फ्रंट’च्या (TRF) दोन सदस्यांना अटक करण्यात आलीय. बारामुलाचा रहिवासी तौसीफ अहमद आणि अनंतनागचा रहिवासी फैज अहमद खान अशी या दोघांची ओळख पटवण्यात आलीय. त्यांच्या चौकशीतून लष्कर ए तोयबा आणि टीआरएफच्या नवा कट समोर आलाय. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानात बसलेल्या आपल्या म्होरक्यांच्या इशाऱ्यावर दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’सोबत हे लोक दहशतवादाचा मोठा कट रचत होते. स्थानिकांत दहशत पसरवणं हाच यांचा मुख्य हेतू होता.