पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा गेमप्लॅन, बैठकीमध्ये कोणतीच चर्चा नाही

पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा गेमप्लॅन,बैठकीमध्ये कोणतीच चर्चा नाही Guardian Minister Dattatraya bharane’s game plan, there was no discussion in meeting
सोलापूरच्या शेतकरी नेत्यांना पुण्याला बोलावून इंदापूरच्या शेतकर्यांचा गोंधळ

कुर्डूवाडी / राहुल धोका – उजनी धरणातील ५ टीएमसी पाण्यासंदर्भात सोलापूर येथील नियोजन भवनमध्ये आयोजित केलेली बैठक रद्द करुन पुणे येथील सिंचन भवनमध्ये ठेवली. या बैठकीला इंदापूरच्या शेतकऱ्यांना बोलाविणे नियोजित नसताना बोलाविले गेले अन् इथंच सोलापूर व इंदापूरच्या शेतकऱ्यांमध्ये उजनीच्या पाण्यासाठी ‘तु तु – मैं मैं’ सुरु झाले. हा सगळा प्रकार पालकमंत्री दत्तात्रय भरणे व सिंचन भवनच्या अधिकाऱ्यांसमोर घडला असुन सोलापूर येथील बैठक रद्द करुन, सोलापूरच्याच शेतकऱ्यांना पुण्याला बोलावुन इंदापूरचे शेतकरी अंगावर सोडण्याचा पालकमंत्र्यांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी झाल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरील शेतकऱ्यांचा रोष आणखीनच वाढला आहे.

आता पुढील आंदोलन गोविंद बागेसमोर

आजच्या बैठकीमध्ये इंदापूरचे शेतकरी बोलाविणे अपरिहार्य आहे. मुळात विषय हा सोलापूरच्या शेतकऱ्यांचा आहे. मात्र याठिकाणी सोलापूर व इंदापूरचे शेतकरी बोलावून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांमध्ये भांडण लावली गेली आहेत . या बैठकीचा मुळ गाभा बाजूलाच राहिला असून सोलापूरची बैठक रद्द करणे. इथल्या शेतकऱ्यांना पुण्याला बोलाविणे. तिथे इंदापूरचे शेतकरी बोलाविणे हे सगळे मोठे षडयंत्र असून यापुढील आंदोलन गोविंदबागेत असणार आहे. अध्यक्ष अतुल खुपसे ,प्रभाकर देशमुख ,माऊली हळणवर शिवाजी बंडगर, धनाजी गडदे, किरण भांगे ,दत्ता मस्के ,दत्ता व्यवहारे ,सचिन जगताप,रोहन नाईकनवरे ,गणेश ननवरे आदि बैठकीला उपस्थित होते .
अतुल खुपसे पाटील
अध्यक्ष, उजनी धरण पाणी संघर्ष बचाव समिती

   याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीच्या आदेशाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी इंदापूर येथील नियोजित प्रकल्पाला वळविले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून कडाडून विरोध सुरू झाला. या निर्णयाच्या विरोधात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून व पुतळा उजनी जलाशयात बुडवून निषेध व्यक्त केला गेला . त्यामुळे पाणी प्रश्नाची पहिली ठिणगी पडली.इंदापूरला जाणारे पाणी वाचले पाहिजे म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये 'उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती'ची स्थापना करण्यात आली. या समितीने दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन केले.हे आंदोलन सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहिले.आक्रमक झालेल्या आंदोलकांना पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची बैठक लावू असे लेखी पत्र मिळाल्यानंतरच आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.
अतुल खुपसे पाटलांसह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोलीसांनी जागोजागी अडविले

सिंचन भवन पुणे येथे बैठक आयोजित केलेली असताना सकाळी सहा वाजल्यापासून पोलीसांचा मोठा फौजफाटा शेतकरी नेत्यांवर वॉच ठेवून होता. पुण्याकडे रवाना झालेनंतर अतुल खुपसे पाटलांसह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागोजागी अडवून तपासणीच्या नावाखाली पोलीसांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच खुपसे पाटील यांच्यासह सर्व शेतकरी एक तास उशीरा पोहचले मात्र सर्व जणांना आत सोडेपर्यंत जाणार नाही ही भूमीका खुपसे पाटलांनी घेतल्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

इकडे दिलेल्या पत्रानुसार दि.७ मे रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देखील आयोजित केलेली नियोजित बैठक जाणीवपूर्वक रद्द करण्यात आली आणि ही बैठक सिंचन भवन पुणे येथे दि.१० मे रोजी आयोजित करण्यात आली असा शेतकर्‍यांचा आरोप आहे .

वास्तविक या बैठकीला केवळ सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते, सिंचन भवनमधील अधिकारी व पालकमंत्री दत्तात्रय भरणे इतकेच उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते पोहोचण्याआधीच इंदापूर तालुक्यातील शेतकरी व शेतकरी नेते सिंचन भवन मध्ये उपस्थित होते. बैठक सुरू होताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोरच सोलापूर आणि इंदापूर शेतकऱ्यांमध्ये उजनीच्या पाण्यावरून ‘तू तू मै मै’ सुरू झाले. त्यामुळे बैठकीमध्ये मुळ विषय बाजुलाच राहिला असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: