अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑक्टोंबर : येथील लायन्स क्लब पंढरपूर यांची शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्त डिझायनर मेणपणत्या व ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रे तयार केल्या आहेत.
गेल्या वीस ते बावीस वर्षापासून येथील अंधशाळे मध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डिझायनर मेणपणत्या तसेच शुभेच्छा पत्रांना पंढरपूर बरोबरच आसपासच्या गावांमधून देखील चांगली मागणी असते.

दिपावली सण अवघ्या चार दिवसांवर येवुन ठेपलेला आहे. दिपावली सणाच्या निमित्ताने संपुर्ण घर तसेच परिसर उजळून टाकणाऱ्या विविध आकाराच्या तसेच प्रकारच्या पणत्या आणि आपल्या नातेवाईकांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा पत्रांना देखील प्रचंड मागणी असते. बाजारा मधून अशा प्रकारच्या पणत्या तसेच शुभेच्छा पत्रे दुकानांमधून विक्रीसाठी सज्ज झालेली आहेत. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेणपणत्या तसेच शुभेच्छा पत्रे विक्रीसाठी उपलब्ध असताना देखील नागरिकांची येथील अंधशाळेतील अंध मुला मुलींनी तयार केलेल्या खास ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रांना तसेच मेणपणत्यांना विशेष पसंती असते.

यावर्षीदेखील अंधशाळेमध्ये मागील महिनाभरापासून मेणपणत्या तसेच शुभेच्छा पत्रे तयार करण्याचे काम सुरु असून हे काम पुर्ण झाले आहे.या वर्षी प्रत्येकी दहा रुपये किंमतीला शुभेच्छा पत्र तर मेणपणत्यांचे दहा नगाच्या एका पाकिटाचे देणगी मुल्य 50 रुपये व डिझायनर मेणपणती अगदी 10 रु पासून ते 90 रु पर्यंत आकर्षक व योग्य देणगी मूल्य आकारण्यात आलेले आहे. अशा प्रकारे या वर्षी दोन हजार शुभेच्छा पत्रे तसेच मेणपणत्यांची एक हजार पँकेट तयार करण्यात आलेली आहे.ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्र असल्याने नागरिकांना पोस्ट खात्यामार्फत टपाल तिकीट न लावता ते विनामुल्य पाठविता येणार आहे.
येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलेस वाव मिळावा या उद्देशाने नागरिकांबरोबरच विविध संस्था, समाजातील मान्यवर व्यक्ती मेणपणत्या तसेच शुभेच्छा पत्रे खरेदी करीत असतात. यावर्षी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष बारहाते, महेश म्हेत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षिका सौ अश्विनी माने, सौ रोहिणी घोडके तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा पत्रे तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी मेणपणत्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

मान्यवरांना शुभेच्छा
येथील अंधशाळे मार्फत दरवर्षी देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार तसेच प्रसिध्द खेळाडू, वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि इतर मान्यवर नागरिकांना खास दिपावली निमित्त शुभेच्छा देण्यासाठी ब्रेल लिपितील ही शुभेच्छा पत्रे पाठविली जातात हे विशेष आहे.
माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडूनही पाठीवर थाप
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) आर.आर. पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी असताना येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या ब्रेल लिपितील शुभेच्छा पत्रांचे कौतूक केलेले होते.शाळे मार्फत राबविल्या जाणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे कौतूक करुन त्यांनी अंधशाळेला पन्नास हजार रुपयांची मदत देखील केलेली होती.