कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठला ३ वर्षांच्या उच्चांक; का वाढत आहेत पेट्रोल-डिझेलचे दर


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या बाजारात तेजी आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किंमतीने ३ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा भारतासह जगभरातील पेट्रोल-डिझेल बाजारावर परिणाम होत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत या आठवड्याच्या सुरुवातीला ८५ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर पोहोचली आहे. २०१८ नंतरचा हा उच्चांक नोंदवला गेला आहे. एक वर्षापूर्वी ब्रेंट क्रूडची किंमत ४२.५ डॉलर प्रति बॅरल होती, जी आता जवळपास दुप्पट झाली आहे.

किंमत वाढण्यास कारण की…
क्रूडच्या किमतीत वाढ होण्याचे एक कारण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था महामारीच्या परिणामांमधून बाहेर पडत आहे आणि आर्थिक हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची मागणी वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली वाढ. या वस्तूंचा वीजनिर्मितीसाठी इंधन म्हणून वापर केला जातो. कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने क्रूडच्या किमतीही वाढत आहेत.

दुसरीकडे, सप्टेंबरमध्ये अमेरिकेत धडकलेल्या दोन मोठ्या वादळांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. तेल उत्पादक देशांच्या ओपेक+ गटाने नुकत्याच झालेल्या बैठकीत दुजोरा दिला आहे की, नोव्हेंबरमध्ये दररोज एकूण कच्च्या तेलाचा पुरवठा ४,००,००० बॅरलने वाढविण्यात येईल. अपुऱ्या उत्पादनामुळे पुरवठा कमी आहे.

आयातदार देशांची पुरवठा वाढवण्याची मागणी
कोविड-१९ मुळे जगभरात प्रवास करण्यावर निर्बंध आल्यामुळे ओपेक+ देशांनी वर्ष २०२० मध्ये कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठी कपात करण्यास सहमती दर्शविली होती. आता कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे, पण उत्पादन वाढवण्याची गती मंद आहे. भारत आणि तेल आयात करणाऱ्या इतर देशांनी तेल पुरवठा वेगाने करण्यासाठी ओपेक+ ला आवाहन केले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती जागतिक अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीला कमकुवत करू शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या

कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर परिणाम करत आहेत. २०२१ मध्ये देशभरात इंधनाच्या किमतीने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली. दिल्लीतील इंडियन ऑईल (IOC) पंपावर पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रत्येकी ३५ पैशांनी महाग झाली आहे. पेट्रोल १०६.८९ रुपये प्रति लीटर, तर डिझेल ९५.६२ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: