Covid Vaccination: लसीकरणाकडे नागरिकांची पाठ!; ‘या’ जिल्ह्यात तब्बल दोन लाख डोस शिल्लक!
हायलाइट्स:
- नगर जिल्ह्यात तब्बल दोन लाख डोस शिल्लक!
- नागरिकांनी लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरवली.
- पालकमंत्री मुश्रीफ सरपंचांना पाठवणार पत्रे.
वाचा: मलिक-वानखेडे वाद: उज्ज्वल निकम यांनी दिला ‘हा’ धोक्याचा इशारा
पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यामध्ये ६७ टक्के नागरिकांनी पहिला डोस तर २३ टक्के नागरिकांना दोन्ही डोस घेतल्याचे आढळून आले. ३३ टक्के लोकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा खूप मोठा पल्ला अद्याप गाठायचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता लशींचा पुरवठा सुलभ झाला आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे दोन लाख डोस शिल्लक आहेत. नेहमीच्या केंद्रांसोबत आता अन्य मोहिमा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुश्रीफ सर्व सरपंच आणि सदस्यांना उद्देशून पत्र लिहिणार आहेत. ग्रामस्थांचे प्रबोधन करून लस घेण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
वाचा:‘आमच्या राज्यात एक तक्रारदार गायब आहे आणि…’; मुख्यमंत्र्यांचं न्यायाधीशांसमोर सूचक विधान
लसीकरणाचा प्रतिसाद का घटला, याबद्दल सांगताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, सण उत्सवांमुळे नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याचे दिसून येते. याशिवाय आता निर्बंध शिथील झाल्याने काम धंदे सुरू झाले आहेत. त्यामुळे लस घेतल्यावर काही काळ विश्रांतीची वेळे येईल, लसीकरणासाठी वेळ जाईल, या शक्यतेमुळे लोक लसीकरणासाठी येत नसावेत, असे दिसते. त्यामुळे प्रशासनातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे.
‘त्या’ विधवा महिलांना स्वावलंबी बनवणार
जिल्ह्यात आतापर्यंत ६९९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील सुमारे ४३०० विवाहित पुरूष आहेत. याचाच अर्थ तेवढ्या महिला विधवा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना सरकारतर्फे विविध प्रकारे मदत करण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. महिला व बाल विकास विभागाच्या मिशन वात्सल्य योजनेतून मदत सुरूच आहे. याशिवाय ग्रामविकास विभागातर्फे वीर भद्रकाली ताराराणी यांच्या नावाने एक योजना सुरू करण्यात आली आहे. यातून या महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देत स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाने या महिलांना भाऊबीज भेट देतोय, अशा पद्धतीने काम करून त्यांच्यापर्यंत लाभ आणि मार्गदर्शन पोहचवावे, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.
वाचा:‘समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलाल तर…’; नवाब मलिक यांना धमकीचा फोन