खानापूर विधानसभा जि. सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे

खानापूर विधानसभा जि.सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे

सुहास बाबर यांना बहुमताने निवडून देण्याचे डॉ. गोऱ्हे यांचे आवाहन

स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी टेंभू पाण्याच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे कार्य केले

विटा सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४ : स्व.अनिलभाऊ बाबर यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. त्यांना योजना पूर्ण करण्याचा ध्यास होता. टेंभू सिंचन योजना पूर्णत्वासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. टेंभू सिंचन योजनेच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांनी या भागातील २४० गावातील ८० हजार २७२ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे काम केलेले आहे. भाऊंनी फक्त पाणी या भागात आणले नसून त्यांनी खऱ्या अर्थाने भगीरथा प्रमाणे गंगा या भागात आणली व हा तालुका आर्थिकदृष्ट्या सक्षम करून पवित्र करण्याचे काम केले आहे, असे गौरोवोद्गार शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

जनतेने या कार्याची पोचपावती म्हणून आणि तालुक्याला आणखीन सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी शिवसेना महायुतीचे खानापूर विधानसभा उमेदवार सुहास बाबर यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील खानापूर – आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आज विटा येथे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

याप्रसंगी उमेदवार सुहास बाबर, अमोल बाबर, सोनिया बाबर, ऍड.राजश्री बाबर, मनीषा बादल, शीतल बादल, सविता जाधव, रुपाली पाटील, सुनीता मोरे आदी उपस्थित होते.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाच्या माध्यमातून या परिसराचा विकास व्हावा, हे स्वप्न पाहिले होते. १९९५ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी कृष्णा खोऱ्याचा विकास करण्याची आखणी करून त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची सुरुवातही केली होती. त्यावेळी विरोधकांनी अनेकदा शिवसेनेला डिवचण्याचे काम केले होते. मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही राजकारणासाठी राजकारण करत नसून जनतेसाठी समाजकारण आणि राजकारण करत असल्याचे ठणकावून सांगितले होते, याची आठवण करून देतांना डॉ गोऱ्हे म्हणाल्या, पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्पष्ट मत होते. या भागातील टेंभू सिंचन योजना मार्गी लागावी यासाठी अनिलभाऊंनी विधानसभेत सतत लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृह आणि सरकारचे लक्ष वेधले.अर्थसंकल्पात योजनेला निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले. तसेच कोविड काळात तालुक्यातील कामगार इतर राज्यांमध्ये अडकून पडले होते, त्यांना स्वगृही आणण्याचे काम,कोविड रुग्णांच्या औषधांच्या उपलब्धतेकरिता भाऊंनी अनेक प्रयत्न केले असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या,जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा अन्यायाविरुद्ध पुकारलेला एल्गार होता आणि तो त्यांनी स्वीकारला होता.आमच्या सगळ्यांकडून आतापर्यंत अनेक लोकहिताची कामे करण्यात आली असून आगामी काळातदेखील ती अखंडपणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने आमच्याबद्दल केला जाणाऱ्या अपप्रचाराच्या शब्दाला ‘एल्गार’ हा शब्द जोडला जाईल आणि जनतेकडून इतिहासात आमच्या सर्वांच्या नावापुढे एल्गार हा शब्द ठळक अक्षरात लिहिला जाईल,असा विश्वास डॉ.निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी सांगितले की,विटा शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी विटा नगर परिषदेच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेस निधी आणण्यात आला.यादरम्यान नागरिकांना वेळोवेळी टँकरने पाणीपुरवठा करून पाण्याची उपलब्धता करून देण्याचे काम करण्यात आले. टेंभू उपसा सिंचन विस्तारित योजनेमुळे वंचित गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यामुळे शेतीला शाश्‍वत पाणी उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांचे पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी काळात विटा खानापूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे प्रस्तावित असून त्यासाठी जनतेने मला विधानसभेत जाण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading