डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वारसा : रिपब्लिकन ऐक्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.यंदा 68 वा महापरिनिर्वानदिन असुन दरवर्षी प्रमाणे यंदाही महापरिनिर्वाणदिनी देशभरातुन आंबेडकरी जनता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यास चैत्यभुमी येथे कोटी कोटी संख्येने उपस्थित राहिल.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर अजुन 15 ते 20 वर्षे आपल्यात राहिले असते तर ते भारताचे प्रधानमंत्री झाले असते.त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो हे आजचे पंतप्रधान जाहीर सांगतात.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत या देशात अनेक लोक नेते आमदार खासदार होत आहेत. क्रांतिसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा हा संपूर्ण जगातला मानवी हक्कांचा क्रांतिकारी प्रेरणादायी लढा ठरला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे समाजाकडे बारीक लक्ष होते. समाजातील समस्या.खेड्यापाड्यात होणारे अत्याचार पाहुन ते गंभीर होत होते.समाजाला न्याय देण्याचा निर्धार त्यांनी केला होता.त्यासाठी संविधान निर्माण करताना स्वत:कडे,स्वत:च्या शरिराकडे दुर्लक्ष करुन त्यांनी संविधान साकार केले.
स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांनीं देशाकडे समाजाकडे लक्ष दिले.या देशात 18 पगड जातिचे भाषेचे लोक राहतात.7-8 धर्माचे लोक राहतात.या सर्वाना एकत्र बांधने फार अवघड होते.मात्र त्यांनी विविधतेने नटलेल्या देशाला संविधानातून राष्ट्रीय एकात्मतेने बांधले.जात,धर्म,भाषा यापेक्षा देश महत्वाचा आहे. वेळ आली तर जात,धर्म ,भाषा,सर्व भेद विसरून सर्वानी एकत्र आले पाहिजे.दलितांवर अत्याचार होत असले तरी देश महत्वाचा आहे हे दलितांना सांगितले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारसारणी ही तोडणारी नाही जोडणारी विचार सारणी आहे.जात,धर्म,भाषा, प्रांत या सर्वापेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे.असे प्रखर राष्ट्रप्रेमाचे विचार त्यांनी दलितांच्या मनावर बिंबवले आहेत.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी ग्रामीण भागातले हजारो आंबेडकरी अनुयायी जमा झाले. तेव्हा त्यांच्यावर सवर्ण समाजाकडुन दलितांवर दगडफेक झाली. अनेक सत्याग्रही रक्तबंबाळ झाले.तेव्हा सर्व सत्याग्रही महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले.त्यांनी दगडफेकीला दगडफेकीने उत्तर देण्याची परवानगी मागितली.तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिसेंला हिंसेने उत्तर देण्याचे नाकारले.जे लोक आज तुमच्यावर दगडफेक करत आहेत.तो त्यांचा दोष नसुन त्यांच्या डोक्यात शेकडो वर्षापासुन पिढ्यांनपिढ्या चालत आलेल्या जातीभेदाचा विचार आहे.त्यासाठी त्यावर दगडफेक करुन चालणार नाही. त्यांच्यातील जातीभेदाचा विचार आपल्याला फेकुन द्यावा लागेल तरच ते भविष्यात आपल्यावर दगड फेकणार नाहीत असे डॉ.बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना समजावले.
घटनेमध्ये कलम 17 नुसार कायद्याने जातीभेद नष्ट केला आहे.मात्र काही लोकांच्या मनातुन जातीभेद गेलेला नाही. आजही काही ठिकाणी दलितांनी घोड्यावर लग्नाची वरात काढली तर काही ठिकाणी अत्याचार होतो.मात्र तरीही समाजात परिवर्तन होत आहे.आजही अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह होतात. आंतरजातीय विवाह यशस्वी होतात.दोन्ही कुंटुंब एकत्र येतात.काही ठिकाणी आंतर जातीय विवाहातुन जातीय अत्याचार होतात.
घटनेने दिलेल्या अधिकारामुळे दलित तरुण प्रगत होत आहेत. आम्ही दलित पँथर स्थापन केली होती,अन्याय अत्याचार आम्ही कुणावर करणार नाही.मात्र अन्याय होत असेल तर अन्याय आम्ही सहन करणार नाही.अशी दलित पँथर मध्ये आमची भुमिका होती.जे आर्थिक,शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मागास आहेत ते सर्व दलित अशी आम्ही दलित पँथर स्थापना करताना दलित समाजाची व्याख्या केली होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या होत्या.त्याकाळात त्यांच्या लक्षात आले की कामगार कामावर कामगार म्हणून एकत्र येतो पण घरी गेल्यावर तो त्याच्या जातीधर्मानुसार वागतो.जातिभेदातून आपल्याच कामगारांवर हल्ले ही करतो. त्यामुळे कामगार म्हणून होणारी एकजूट जातीभेदातून फुटत असते. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून त्यांनी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेंडरेशन ची स्थापना केली होती.देशातील सर्वहारा वर्ग कष्टकरी वर्ग या 85 टक्के समाजाचे नेतृत्व करण्याची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भुमिका होती. 1952 चा पहिल्या लोकसभा निवडणुकित काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला.1954 मध्ये भंडारा मध्ये काँग्रेस ने बाबसाहेबांचा पराभव केला.शेड्युल्ड कास्टच्या मतांवर मी निवडुन येत नाही तर माझे लोक कसे निवडुन येतील.सत्ता मिळवण्यासाठि कार्यकर्ते निवडुन आले पाहिजे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची संकल्पना मांडली.त्यांच्या महापरीनिर्वाणा नंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली.
आर.पी.आय ला फुटीचा शाप लागला आहे.आर.पी.आय कधी एकत्र येत नाही.जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा 1998 मध्ये आमचे आर.पी.आय चे 4 खासदार निवडुन आले होते. स्व:बळावर आपले लोक निवडून आणने कठीन आहे. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग चांगला होता मात्र त्यांना त्यांच्या पक्षाला एवढ्या वर्षात मान्यता मिळवता आली नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र आले पाहिजे.चार पावले मागे येण्याची माझी तयारी आहे.बाळासाहेब आंबेडकरांनी आर.पी.आय चे अध्यक्ष व्हावे.सर्व नेत्यांनी एकत्र यावे.त्या रिपब्लीकन ऐक्याला जनता प्रतिसाद देईल.त्यानंतर एखाद्या पक्षाची युती केली तर रिपब्लिकन पक्षाची राजकीय ताकद उभी राहिल. रिपब्लिकन ऐक्यामुळे आंबेडकरी जनतेची राजकीय ताकद उभी राहील.असा भविष्यात माझा प्रयत्न आहे.त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे.मी शिवसेना भाजपा सोबत युती मध्ये असलो तरी काही निळा आंबेडकरी विचारांचा झेंडा सोडलेला नाही. आंबेडकरवाद माझ्या नसानसात भिनलेला आहे.बाळासाहेब ठाकरेंनी शिवशक्ती भिमशक्ती एकजुटीची भुमिका मांडली.मी सर्व विचारवंतांचा सल्ला घेऊन शिवशक्ती भिमशक्ती भाजप युतीचा प्रयोग केला. माझे काम चालु आहे.
दलित पँथर सारखी चळवळ आता उभी राहत नाही.दलित पँथरच्या काळात नामातंराच्या मागणीवर मोठा लढा आम्ही दिला.त्याला जनतेने मोठी साथ दिली.समाज अजुनही संघर्षशील आहे.सध्याच्या परिस्थितति आर्थीक प्रश्नाच्या मुद्यावर लोक एकत्र येत नाहीत.ग्रामिण भागातील प्रश्न झोपडपट्टयांचे प्रश्न बेरोजगारी यावर आंदोलन उभारण्याचा माझा प्रयत्न आहे.
माझे मंत्री पद हे माझे नाही.ते समाजाचे मंत्रीपद आहे. कार्यकर्त्यांचे मंत्रीपद आहे.मी मंत्री झाल्यामूळे माझा पक्ष देशभर वाढला आहे.ईशान्य भारतातील सर्व राज्यात माझा पक्ष पोहोचला आहे.नागालँड मध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडुन आले आहेत. मणिपुर मध्ये माझ्या पक्षाला 17 टक्के मतदान मिळाल्यामुळे मणिपुर मध्ये माझ्या पक्षाला मान्यता प्राप्त झाली आहे.नागालँड, मणिपूर या दोन राज्यात रिपब्लिकन पक्ष मान्यता प्राप्त झाला असुन आणखी दोन राज्यात मान्यता प्राप्त झाल्यास रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणुन मान्यता प्राप्त ठरेल.संपूर्ण देशात पक्ष वाढवण्याचे काम सुरु आहे.
बाबासाहेबांचा अभिमान आम्हाला आहे. त्यांच्यां प्रेरणेमुळे आम्ही या मैदानात उतरलो आहोत.मैदान गाजवण्याची संधी आम्हाला बाबासाहेबांमुळेच मिळाली आहे.बाबासाहेब नसते तर आम्हाला कोणी विचारले नसते. आम्ही कुठेच नसतो, बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारामुळे,आम्ही ताकदवान चळवळ उभी करु शकलो.बाबासाहेबांचा आर्शिवाद आम्हाला आहे. त्यांचा राजकीय वारसा रिपब्लिकन पक्ष आहे. तो राजकीय वारसा आम्ही चालवीत आहोत.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करणे हेच खरे महामानवाला विनम्र अभिवादन ठरेल !
-रामदास आठवले केंद्रीय राज्य मंत्री
भारत सरकार
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.