उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल नेमकं काय म्हणाल्या ?

कर नाही त्याला डर कशाला,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/१२/२०२४ – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. त्याचवेळी आज ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.त्याचबरोबर विरोधकांवर थेट हल्लबोल केला आहे.

महायुतीचे सरकार येत आहे आणि आमचे मुख्यमंत्री होत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे.देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं म्हणता येईल इतकं घवघवीत यश आम्हाला जनतेने दिलंय. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे मुख्य नेते आणि देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि हजारो कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्याचं आम्हाला यश मिळालं. मी तर याचं पहिलं श्रेय देवाला देते. कारण आमची प्रार्थना होती की महाराष्ट्रामध्ये जो विकासाचा रथ चाललेला आहे त्याला आडकाठी येईल अशा कुठल्याही घटना घडू नये यादृष्टीने लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही भरपूर काम केलं.

विशेष म्हणजे शिवसेनेला पूर्वी 63 जागा मिळाल्या होत्या पण त्याच्यातही मूळच्या शिवसेनेच्या 56 जागा होत्या आणि आता आमच्या मूळच्या शिवसेनेच्या 57 जागा विधानसभेला निवडून आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मनामध्ये समाधान आहे पण यामध्ये महायुतीचे अतिशय चांगले आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे काम चांगलं होऊ शकेल आणि कुठल्याही प्रकारे अडसर येण्यापेक्षा सकारात्मक भूमिका राहील, असं डॉ.नीलम गोऱ्हे स्पष्ट शब्दात म्हणाल्या.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल! नेमकं काय म्हणाल्या ?

विरोधकांकडून प्रचारादरम्यान वारंवार एक टीका केली जात होती की, आमचे सरकार आल्यावर महायुतीच्या नेत्यांना तुरुंगात टाकू पण आता विरोधकांची ही इच्छा अपूर्ण राहिली का ? असा प्रश्न विचारला असता यावर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कर नाही त्याला डर कशाला त्यामुळे आम्ही काही कर चुकवलेला नाहीये आणि काही केलेलंही नाहीये परंतु समोरच्याचा अपराध म्हणजे मतभेद असणं, अशीच भूमिका काँग्रेसची पण आहे कारण त्यांनी आणीबाणी लादली होती. आज त्यांनी कसे योग्य ते नॉर्म्स टाकले याच्यावर काही वृत्तपत्रात लोक बोलतात पण मुळामध्ये त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली, त्यांच्या राज्यपालांची, त्यांच्या भूमिकांची तर महिला आरक्षण विधेयकसुद्धा त्यांनी लोंबकळत ठेवलं. तलाक पीडित महिलांना न्यायसुद्धा दिला नाही.

दुसरीकडे आज आम्ही पाहतो की अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे काम करतात त्यांच्यापैकी अनेकांची भूमिका होती की, आमचं सरकार आल्यावर आम्ही तुरुंगात टाकू, पण तुरूंगात कशाबद्दल टाकणार आहात? तुमच्याशी मतभेद म्हणजे हे तुरूंगात टाकण्याचं कारण होऊ शकत नाही. देशद्रोह, शांतता सुव्यवस्था बिघडवणं असं काय केलं होतं आम्ही की, ज्याबद्दल सारखं असं बोललं जातं होतं आणि यामुळेच मला वाटतं ज्याची पाठी त्याच्या काठी, अशा शब्दात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading