माढा तालुक्यात बालक कोरोना पाॅझिटिव्ह तत्काळ दक्षता घ्या – आ.बबनराव शिंदे

माढा तालुक्यात २५ बालक कोरोना पाॅझिटिव्ह तत्काळ दक्षता घेण्यासाठी आ.बबनराव शिंदे यांची सूचना MLA Babanrao Shindes instruction to take immediate precautions against 25 corona positive in Madha taluka
 कुर्डुवाडी / राहुल धोका - माढा तालुक्यात २५ बाल रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.त्यामुळे गावामध्ये कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन मध्ये न ठेवता त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करावे, जेणेकरून घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तींना त्याचा संसर्ग होणार नाही आणि रुग्णही वेळेत दाखल केल्यामुळे बरा होण्यास मदत होईल. हे काम तलाठी, ग्रामसेवक ,आशा वर्कर्स,नर्स,ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी आपापल्या गावांमध्‍ये करावे असे प्रतिपादन माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी केले.

सध्या कोविड सेंटरमध्ये ज्येष्ठ व्यक्तींपेक्षा लहान मुलांची संख्या वाढू लागल्याने सगळ्यांच्याचीच चिंता वाढलेली आहे आहे. त्यामुळे लहान मुलांना होत असलेल्या संसर्गाचा विचार करता, केवळ घरांमध्ये बाधित झालेल्या व्यक्तीमुळे हा संसर्ग वाढत असल्याचे समोर आल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

   लहान मुलांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे अवघड आहे कारण ती आई वडीलांशिवाय राहू शकत नाहीत त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या टेम्भूर्णी कुर्डूवाडी माढा कोविंड सेंटर मध्ये २५ बालके दाखल झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे . ही परिस्थिती गंभीर असून  परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच यावर उपाय म्हणून आपण टेंभुर्णी, कुर्डूवाडी, माढा, करकंब, महाळुंग येथे बाल कोविड रुग्णालय चालू करण्याच्या सूचना यापूर्वी दिलेले असून टेंभुर्णी येथील यशश्री हॉस्पिटल, कुर्डूवाडी येथील साखरे हॉस्पिटल व बोबडे हॉस्पिटल आणि माढा येथे ग्रामीण रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय करकंब, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंग येथे बाल कोविंड सेंटर सुरू होणार आहेत.

   सध्या टेंभुर्णी येथे २५ मुले कोविड सेन्टरमध्ये दाखल झाली आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . सदरची मुले ५ ते १५ या वयोगटातील असल्याने ती एकटी राहू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्याबरोबर आई किंवा वडिलांना थांबावे लागत आहे ही सगळ्यात मोठी समस्या आहे.तेव्हा लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा लागणार आहे त्यासाठी मनोरंजनाची साधनेही निर्माण करावी लागणार आहेत असे सांगून आ.बबनदादा शिंदे म्हणाले ,यातून आपल्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घरातील पॉझिटिव व्यक्तीने लगेच कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे, जेणेकरून आपल्यापासून घरातील इतर व्यक्तींना त्याची बाधा होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. कोविड सेंटरमध्ये लवकर दाखल झाल्याने फक्त औषध उपचाराने रुग्ण थोड्या दिवसात बरा होऊ शकतो.गावामध्ये एकही पॉझिटिव व्यक्ती  होम कॉरंटाइन होता कामा नये, तसे राहण्याने आपल्या कुटुंबाला धोका होऊ शकतो त्यामुळे अशा व्यक्तींना ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती , तलाठी ,ग्रामसेवक ,आशा वर्कर्स यांनी ताबडतोब माहिती देऊन संबंधित व्यक्तीला कोविड सेंटरमध्ये दाखल करावे व न ऐकणाऱ्या माणसांसाठी पोलिसांची मदत घ्यावी असेही आमदार बबनदादा शिंदे म्हणाले.

आता घरोघरी जाऊन कोरोना तपासणी होणे गरजेचे आहे कारण कोवीड सेंटर मध्ये रुग्णांना राहावे लागेल या भितीने लोक तपासणी करून घेण्याचे टाळतील आणि आजार वाढल्यानंतर औषध उपचाराला उशीर झालेला असतो त्यामुळे जीवितहानी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: