पंढरपुरातील त्या कार्यक्रमाचा इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने केला निषेध

पंढरपुरातील त्या कार्यक्रमाचा इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनने केला निषेध

वसुलीसाठी कष्ट करणाऱ्या वायरमन यांनाच ठेवले कार्यक्रमापासून वंचित

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०५/२०२४- दि.22 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पंढरपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी मार्च 2024 च्या महसूल वसूलीसंदर्भात सर्व उपविभागीय कार्यालय व विभागीय कार्यालय यांचे उद्दिष्ठ पुर्ती झालेबाबत गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता यांनी जनमित्र (वायरमन) यांना सोडून विभागीय व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी, विद्युत ठेकेदार यांना आदरपुर्वक बोलावले परंतू या कार्यक्रमास विभागीय कार्यालयातील एकाही जनमित्रांला (वायरमन) यांना आमंत्रित केलेले आढळले नाही.त्यामुळे याचा इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. सदरचे निवेदन कार्यकारी अभियंता पंढरपूर यांना देण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचा इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणेश विठ्ठल रणदिवे,विभागीय सचिव संतोष गणपती काशिद,उमेश चव्हाण, ज्योतिराम रणदिवे,महावीर जाधव, गजानन राऊत,महेश कोतवाल,सारंग कोल्हे, सिताराम लोखंडे,मोहन मोटे,समीर मुलाणी, बलभिम बोडके, सचिन सरवदे,पवन नेरकर, हंबीरराव शेळके यांच्यासह अनेक जनमित्र (वायरमन)यांनी निषेध केला आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, महावितरण कंपनीमध्ये जनमित्र (वायरमन) हा महत्वाची भूमिका बजावणारा घटक असून आशिया खंडामध्ये प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून महावितरण कंपनीचा नावलौकिक आहे. अशा नावलौकिक असणाऱ्या कंपनीचा जनमित्र (वायरमन) हा कणा असल्याचे वारंवार वरिष्ठ कार्यालयाच्या संवादातून, पत्र व्यवहारातून जाणवते आणि अशा जनमित्र (वायरमन) यांनाच आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्यास आमंत्रित करण्याची किंवा त्यांना बोलविण्याची तसदी न घेता सदर कर्मचाऱ्यांची कार्यकारी अभियंता यांनी अवहेलना केली असून त्यांचा अपमान केलेला आहे असे इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेस वाटते. मागील गुणगौरव सोहळ्याचा आढावा घेतल्यास एकही सोहळा जनमित्र (वायरमन) यांना सहभागी न करता किंवा त्यांना वगळून झालेला नाही.

महावितरण कंपनीच्या महसूल वसुलीकामी जनमित्र (वायरमन) यांचा मोठा सहभाग असतो. महसूल वसुली प्रसंगी जनमित्र (वायरमन) यांना ग्राहकांच्या रोषाला, नाराजीला सामोरे जावे लागते. काही वेळा जनमित्रांना शिवीगाळ केली जाते, मारहाण होते अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तरी ही जनमित्र (वायरमन) त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात कोणतीही आणि कसलीही कसर सोडत नाहीत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सदर जनमित्र (वायरमन) त्याला येत असलेल्या अडचणींची तक्रार देखील करीत नाहीत. आपले कर्तव्य पार पाडत असताना वेळेचा,भुकेचा,उन- वारा, पाऊस याचा विचार करत नाही आणि कार्यकारी अभियंता यांनी अशा जनमित्र (वायरमन) यांना डावलून गुणगौरव सोहळा योग्य नियोजन करून पार पाडला. जनमित्र (वायरमन) यांनाच कार्यक्रमाला बोलविले नाही याचा आम्ही निषेध करत आहोत.

सदर गुणगौरव सोहळ्यास जनमित्र (वायरमन) यांना आमंत्रित न केल्याने इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन सदर कार्यक्रमाचा जाहीर निषेध करत आहे. संघटनेचे सभासद यांना अपमानास्पद वर्तुनुकीमुळे जनमित्र (वायरमन) यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.या निवेदनाच्या प्रति अधिक्षक अभियंता मंडळ कार्यालय सोलापूर, मुख्य अभियंता बारामती परिमंडळ कार्यालय बारामती,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी बारामती परिमंडळ कार्यालय बारामती,केंद्रीय सरचिटणीस, कोषाध्यक्ष इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *