महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या कमी आलेल्या जागांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडलो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्रात महायुती आणि भाजपच्या कमी आलेल्या जागांची मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आपण स्वतः कुठेतरी कमी पडलो आहोत ती कमतरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असल्याने मला राज्य सरकार मधून मुक्त करावे अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सोडण्याचे संकेत दिले आहेत तर फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून गळ घातली जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात लोकसभेत कमी जागांवर विजय मिळाल्याबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षासाठी पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी ज्यामुळे राहिलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल आणि मी जरी बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काय काय करायचे आहे ते आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणारच आहे. यासंबंधी मी पक्षातील वरिष्ठांची भेट घेणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक घेऊन समन्वयांच्या विषयावर चर्चा करू. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले असून त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला आहे.मराठा आरक्षणाच्या बाबतचा मुद्दा तसेच कांदा प्रश्नाचाही फटका आम्हाला बसला आहे.आम्ही मराठा आरक्षण दिल्यानंतरही त्याबाबत विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडलो अशी कबुलीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी ही सामूहिक असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *