मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर -आ.आवताडे
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०६/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला असून या भागांमध्ये उद्योगधंदे वाढवणे व शेतीच्या पाण्याची सोय करणे हे प्रमुख काम डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. या भागात उद्योग वाढवायचे असतील तर पहिल्यांदा व्यवस्थित दळणवळणाची सोय झाली पाहिजे तरच उद्योगधंदे फायदेशीर ठरत असतात ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून १८६ कोटी २१ लाख रुपयाचा तालुक्याच्या दक्षिण भागातून पूर्व पश्चिम महामार्गाला जोडणारा ४४ किमीचा सिमेंट रस्ता मंजूर केला केला असून या रस्त्यामुळे या भागात महामार्गाला पोहोचण्यासाठी जवळचा सोयीस्कर मार्ग होणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पंढरपूर मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी मिळविला आहे. नुकतेच बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित योजने अंतर्गत मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे-कर्जाळ- कात्राळ-हुलजंती-पौट-निंबोणी-नंदेश्वर-गोणेवाडी-लेंडवेचिंचाळे ते राष्ट्रीय महामार्ग १६६ ला जोडणारा रस्ता ४४ किलोमीटर अंतराचा सिमेंट रस्ता मंजूर झाला आहे त्यामुळे दोन्ही महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे या भागातील दळणवळणास चालना मिळणार आहे सदरील रस्ता दहा मीटर रुंदी ने होणार असून या रस्त्यावर पूल बांधणे,पाईपच्या मो-या करणे अशी कामे समाविष्ट आहेत. तरी लवकरच या रस्त्याच्या कामाची निविदा निघून कामास सुरुवात होणार असून ३५ गाव पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीनंतर या भागात दुसरा मोठा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.