निष्ठावंतांना संधी देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार : शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ
उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत फायदा होणार
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३: पायात चप्पल घालण्यासाठी पैसे नव्हते पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना आमदार, खासदार,मंत्री केल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा हाच वारसा सध्या आपले नेते एकनाथ शिंदे चालवत आहेत असे मत शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी व्यक्त करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला तसेच उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत चांगला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांच्या माध्यमांतून शिवसेना जिल्हा पदाधिकारी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन आज पुणे येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेत ना.एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधला.इरफान सय्यद,श्रीमती ममता शिवतारे लांडे, किरण साळी आदी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.आपत्ती व युद्धजन्य परिस्थितीतील कार्यपद्धती,प्रभावी संवाद कौशल्य व नेतृत्वगुण,सायबर सुरक्षेबाबत जनजागृती, सोशल मीडियाचा संघटनात्मक वापर, तणावमुक्त मन आणि मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा,पक्षाची आर्थिक शिस्त व नियोजन या विषयावर विविध मान्यवरांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी आनंदराव आडसूळ म्हणाले,एकनाथ शिंदे यांनी पैसेवाल्यांपेक्षा कतृर्त्ववान शिवसैनिकांचा सन्मान केला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्येही हाच न्याय निष्ठावंत शिवसैनिकांना मिळेल.आगामी निवडणुका लक्षात घेऊन इच्छुकांनी आपल्या पक्षाचे विचार तळागळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले,तीन वर्षांपूर्वी निष्क्रिय लोकांपासून पक्षाला व त्यामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाला न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोणताही विचार न करता बंड केले.या बंडामुळे पक्ष तर वाचलाच पण जे निष्ठावंत शिवसैनिक आणि नेते होते त्यांनाही एक प्रकारची उर्जा आणि ताकद देखील मिळाली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा आपल्याला प्रत्यय आला आहे.दोन्ही निवडणुकीत पैसा हा निष्कर्ष न ठेवता काम करणारा आणि पक्षाला वाहून घेतलेला शिवसैनिक आपल्याला आज सत्तेत बसलेला दिसतो आहे.आता हाच न्याय येणाऱ्या निवडणुकांमध्ये लावला जाणार आहे.मी स्वत: एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्घती पाहिलेली आहे.शिवसेनाप्रमुखांचा जो विचार होता तो तळागळातील शिवसैनिकांना आधी न्याय, हाच विचार आज एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत.लोकसभा, विधान सभा ही नेत्यांची निवडणूक असते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था या शिवसैनिकांच्या निवडणुका असणार आहेत.जो शिवसैनिक पक्षासाठी राबत असतो त्याला नगरसेवक,जिल्हा परिषद, पंचायत समितीत काम करण्याची संधी या निवडणुकीतून मिळणार आहे. मात्र एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असू शकतात अशावेळी मतभेद बाजूला ठेवून मनभेद न करता ज्याला पक्ष संधी देईल त्याच्या पाठीशी उभे राहून शिवसेनेचा उमेदवार कसा विजयी होईल या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले,उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी आज जे शिबीर आयोजित केले आहे त्याचा खरोखरच येणाऱ्या निवडणुकीत चांगला फायदा होणार आहे.शिवसैनिक सदैव लढायला तयार असतो मात्र त्याला योग्य दिशा मिळत नसते. आजच्या शिबिरातून शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने जनतेप्रती काम करत असताना कसे करावे याची दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही असे उद्गारदेखील त्यांनी काढले.त्याच बरोबर संयोजक डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे शिबीर आयोजित केल्याचे सांगून येणाऱ्या काळात जो शिवसैनिक आहे त्याला जनतेसमोर जाताना कोणतीही अडचण येवू नये,समाजात वावरत असताना, पक्षाचे विचार वाढवत असताना आपले नेतृत्वही कसे घडेल या दृष्ट्रीने आजचे शिबीर उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीच्या विजयात शिवसेनेचा सिंहाचा वाटा : डॉ.नीलमताई गोऱ्हे
आज आपल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी जे शिबीर आयोजित केले होते त्या शिबिराचा येत्या काळात निश्चित फायदा होईल असे मत व्यक्त करीत नीलम ताई गोऱ्हे पुढे म्हणाल्या,शिवसेना स्थापनेपासून ज्या ठिकाणी शहर आणि गाव त्या ठिकाणी शिवसेना राहिली आहे.त्यानुसार आपला प्रत्येक शिवसैनिक काम करीत राहिला आहे. यापुढील काळातदेखील अधिक जोमानं काम शिवसैनिकांनी करावे,असे आवाहन देखील त्यांनी केले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आली आहे.पण या विजयामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागल पाहिजे,त्या दृष्टीने आता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गट आणि गणनिहाय बांधणी करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर युती झाली तर आनंदाच आहे.परंतु युती झाली नाही तर स्वतंत्र जायला लागले तर पाठीमागे वळून बघण्याची गरज नाही.त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढ्या जागा उपलब्ध होणार आहेत आणि त्यातून आपला कस लावता येणार आहे. त्यामुळे सर्वानी मिळून काम करावे, असे आवाहन देखील पदाधिकाऱ्यांना त्यांनी केले.
शिबिरात युद्धजन्य परिस्थितीत घ्यावयाची काळजी यावर आपत्ती व्यवस्थापनचे मास्टर ट्रेनर विवेक नायडू , संभाषण कौशल्य यावर विजय नवले,सायबर क्राईम व सिक्युरिटी यावर ॲड.प्रतिक तेंडुलकर,सोशल मिडीया वर शिवसेना केंद्रिय सोशल मिडीयाचे पांडुरंग पवार,मनाची तणावमुक्ती डॅा.दत्ता कोहिनकर, महिलांचे आरोग्य यावर डॅा. ममता लांडे , आर्थिक व्यवस्थापन यावर स्मिता भोलाणे यांनी विचार मांडले.

