केंद्र व राज्य शासन शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी- पालकमंत्री जयकुमार गोरे
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील शाळेला पालकमंत्र्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी साधला संवाद व वाढवला उत्साह
पहिलीच्या नवागतांचे बैलगाडीतून मिरवणूक पालक मंत्र्यांनी बैलगाडीचे केले सारथ्य…

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका,दि.16:- आधुनिक शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शाळांना मॉडेल बनवण्याचे काम केंद्र व राज्य शासन करीत आहे.विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासन विद्यार्थ्यां साठी विविध योजना,उपक्रम राबवित आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासन शालेय शिक्षणा साठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे,असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

आज दि.16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला.शाळा प्रवेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील शाळेला भेट दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव,प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे,सरपंच डॉ अमृता रणदिवे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष वामन वनसाळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शासना च्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत.प्रत्येक मुलाने शाळेत प्रवेश घेतला पाहिजे.जे शिक्षणापासून वंचित आहेत आर्थिक परिस्थितीमुळे मुले शाळेत पाठवले जात नाहीत अशा पालकांनी आपल्या मुलाला शाळेत पाठविण्यासाठी हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.शाळा चांगल्या असाव्यात म्हणून आदर्श शाळा निर्माण करण्याचे काम शासन करीत आहे.अनेक शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनामार्फत मुलांना गणवेश,शूज पाठ्यपुस्तके देत आहे. मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देत आहेत.कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावे, राज्यातील ग्रामीण भागातील सर्व जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविण्याचे काम ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी शाळा आणि शिक्षणाचा दर्जा उंचवण्याचं काम तुंगत येथील जिल्हा परिषद शाळेचे आहे.या शाळेने इंजिनियर ,डॉक्टर उच्च अधिकारी बनवण्याचं काम केलं आहे.आज या शाळेत ज्या बालकांनी प्रवेश घेतला आहे ती मुले भविष्यात उच्च शिक्षित होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पहिलीच्या नवागतांचे बैलगाडीतून मिरवणूक पालक मंत्र्यांनी बैलगाडीचे केले सारथ्य : पडत्या पावसातही भाषणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तुंगत या ठिकाणी प्रवेशोत्सवानिमित्त नवागातांचे स्वागत करण्यासाठी बैलगाडीच्या व ट्रॅक्टर च्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनी बैलगाडीचे सारथ्य केलं. पालकमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसामुळे काही विद्यार्थ्यांचा चुळबुळ सुरू असताना पालकमंत्री यांनी मुलांनो शांत बसा … हाताची घडी… तोंडावर बोट म्हणातच विद्यार्थी एकदम शांत झाले व पडत्या पावसातही विद्यार्थ्यांनी भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तत्पुर्वी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे मंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक करुन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

