डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
नवी दिल्ली 16: दैनिक केसरी वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक डॉ.दीपक टिळक यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाबद्दल युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी दुःख व्यक्त केले असून डॉ.दीपक टिळक यांचे कार्य प्रेरणादायी होते,अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रक्षा खडसे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्याशी आणि केसरी सारख्या ऐतिहासिक वर्तमानपत्राशी निगडित असलेले डॉ. दीपक टिळक यांचे निधन हे पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी हानी आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले केसरी हे वर्तमानपत्र भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार राहिले आहे. त्या ऐतिहासिक वारशाचे डॉ.दीपक टिळक यांनी अत्यंत जबाबदारीने आणि निष्ठेने संवर्धन केले. पत्रकारितेतील त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.राज्य व देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.केसरी च्या माध्यमातूनच नव्हे तर विविध उपक्रमांतून त्यांनी समाज घडवण्यात योगदान दिले.त्यांच्या निधनाने केसरी परिवार आणि टिळक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,असे रक्षा खडसे यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

