वन्यजीवांना उत्तम दर्जाचे पाणवठे बांधून द्या- आ समाधान आवताडे यांची मागणी
पाणवठे वनविभागाच्या हद्दीत उभारण्यात येऊन ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी सरकार तालुकास्तरीय समितीची स्थापना करणार का? – आमदार आवताडे
मुंबई ,दि.१८/०७/२०२५-महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, वन्यजीवांसाठी पाणीे पिण्याची योग्य सुव्यवस्था करण्याकरिता हे पाणवठे वनविभागाच्या हद्दीत उभारण्यात येऊन ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी सरकार तालुका स्तरीय समितीची स्थापना करणार आहे का? याबाबत आमदार आवताडे यांनी उपप्रश्न उपस्थित करून सभागृहाचे व मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.

सदर मागणी मांडताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुका पाण्याअभावी दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो.अगदी जानेवारी पासूनच नागरिकांना व जनावरांना पाण्याच्या शोधात मोठी भटकंती करावी लागत असते. अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील मारोळी येथे दोन तरस प्राणी पाण्यासाठी जंगला बाहेर आले असता नाहक त्रासापोटी भयभीत झालेल्या नागरिकांनी हल्ला होण्याच्या भीतीपोटी त्यातील एक तरस ठार केला.जंगलातील हरीण,मोर तसेच इतर वन्यजीव पिण्याच्या पाण्याच्या शोधात सर्वदूर मानवी वस्तीत फिरत असतात त्यामुळे त्यांचा आकस्मित अपघात होतो व प्रसंगी त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.अशा सर्व बाबींचा शासनदरबारी संवेदनशील मार्गाने विचार करुन लवकरात- लवकर नियोजित पाणवठे निर्माण करुन त्यामध्ये कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.
सामाजिक व सांप्रदायिक कार्य सेवेसाठी केंद्रस्थानी असणाऱ्या मंगळवेढा येथील वारी परिवाराचे व त्यांच्या सेवाभावी कार्याचे देखील आ.समाधान आवताडे यांनी सभागृहात कौतुक केले आहे.काळ्या शिवारातील पक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वारी परिवाराचे सदस्य अहोरात्र झटून त्यांची सोय करत असतात. त्याच बरोबर आदर्श परिवाराचाही त्यांच्या सामाजिक क्रियाशीलतेबद्दल आमदार आवताडे यांनी विशेष उल्लेख केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सेवेचा वसा आणि वारसा जतन करण्यासाठी मानवी व इतर सजीव जीवनमूल्यांशी निगडीत सेवाभाव डोळ्यासमोर ठेवून वारी परिवार एकदिलाने लोकाभिमुख कार्य करत आहे. अशा आमच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी राज्याच्या विधीमंडळात आमच्या कार्याचा उल्लेख केल्याने आम्हाला सार्वजनिक जीवनात आणखी मोठे कार्य करण्यासाठी मोठी चालना आणि प्रोत्साहन प्राप्त झाले आहे- सतिश दत्तु, संस्थापक वारी परिवार मंगळवेढा
सदर मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांनी वन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गरजेनुसार वनबंधारे बांधून त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी वन खाते घेईल, असे आश्वस्त केले.