अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात संपन्न
समाजाने यशस्वी झालेल्यांच्या कामातून सकारात्मक संदेश घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ जुलै २०२५: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे यांच्या वतीने आयोजित भूषण पुरस्कार वितरण सोहळा आज मंडई म्हसोबा चौक येथे उत्साहात पार पडला.विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करत असलेल्या या ट्रस्टच्या कार्याचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कला भूषण पुरस्कार: सविताताई मालपेकर, संगीत भूषण पुरस्कार: श्रीनिवास जोशी, व्यापार भूषण पुरस्कार: संजय चितळे, धार्मिक भूषण पुरस्कार: ह.भ.प.योगी निरंजननाथ, विशेष पुरस्कार: रागिनी खडके (कार्याध्यक्ष, सद्गुरू बाळूमामा मंदिर),पत्रकारिता भूषण पुरस्कार :आनंद अग्रवाल, उद्योग भूषण पुरस्कार :निलेश भिंताडे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या प्रभावी भाषणात महिलांच्या शिस्तबद्ध आणि संघर्षशील भूमिकेचा विशेष उल्लेख केला.व्यापार,उद्योजकता,प्रशासन,कला, धार्मिक, संगीत आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत यशस्वी कार्य करणाऱ्या भूषण पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना त्या म्हणाल्या,दुधाला भाव मिळवून देण्यापासून ते शैक्षणिक कार्यासाठी निधी वापरण्यापर्यंत संजय चितळे व चितळे उद्योग समूहाने विधायक काम केले आहे.आज उपस्थित असलेल्या महिलांमध्ये उत्साह,जिद्द आणि शिस्त लक्षणीय आहे.सतत समाजकार्यात योगदान देणे सोपे नाही,परंतु पुरस्कार विजेत्यांनी हा दरारा प्रामाणिकपणे राखला आहे.
त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर, प्रशासन अधिकारी रागिनी खडके,गायक श्रीनिवास जोशी आणि उद्योजक संजय चितळे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. सविता मालपेकर यांचा उल्लेख करताना त्यांनी मराठी नाट्यसृष्टी आणि मालिकांमुळे स्त्रियांच्या जीवनात आलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला.घराघरातील मालिकांमुळे स्त्रिया सुख-दुःख वाटून घेतात, त्यांना जवळच्या महिलांचे प्रतिबिंब या मालिकांमध्ये दिसते.त्यामुळे त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास जागतो,असे डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.
महिला सबलीकरणावर बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांनी समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होण्याची आवश्यकता अधोरेखित केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये एक तृतीयांश आरक्षण दिले आहे. आता महिलांनी नेतृत्वात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँका आणि शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही,याची ग्वाही देऊन लाडक्या बहिणींना बँकांना जोडून घेण्याच्या कार्यक्रमाची गरज डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.लाडकी बहीण योजना,वयोश्री योजना या योजनांचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा आणि उद्योजकतेसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, स्त्रियांनी एकत्र येऊन चुकीच्या गोष्टींना विरोध केल्यास कुणालाही वाईट वागण्याची हिंमत होणार नाही. महिलांनी एकमेकींच्या पाठीशी उभे राहणे ही आजची गरज आहे. महिला हीच महिलांची शत्रू असते ही धारणा आता बदलायला हवी.
या सोहळ्याला आमदार विजय बापू शिवतारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी,विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती विजय जाधव यांनी केले होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नितीन पवार उपस्थित होते.