सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे / जिमाका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा सीओईपी अभिमान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सीओईपीसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेत येण्याचा मनस्वी आनंद आहे. 2028 साली या संस्थेची गौरवपूर्ण अशी 175 वर्षे पूर्ण होत आहेत. सीओईपीशी संबंधित सर्वांना शुभेच्छा देत व त्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री म्हणाले की,आपल्या सर्वांच्या योगदानामुळे भारतातली एक महान संस्था उभी राहिली आहे.राज्यात व देशभरात अनेक प्रथितयश अशी व्यक्तिमत्त्वे या संस्थेने घडविलेली आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांनी केले आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तंत्रज्ञानाच्या,अभियांत्रिकीच्या क्षेत्रात सीओईपीने मोठे नाव कमावले आहे. येथे होणारे विविध उपक्रम,संशोधन व एकूणच ‘अकॅडेमिक इन्स्टिट्यूशन’ म्हणून सीओईपी जे योगदान देत आहे, ते पाहिल्यानंतर, सीओईपी अतिशय महत्वपूर्ण अशी संस्था आहे, हे लक्षात येते.सीओईपी संस्थेच्या विस्ताराकरिता शासनाने जागा दिली असून, अशा संस्थांना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. येत्या काळात सीओईपीसारख्या संस्थेला अधिक समृद्ध करण्याकरिता पूर्ण सहकार्य करण्यात येईल आणि संशोधन उभे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असे मुख्यमंत्री म्हणाले.

आज खऱ्या अर्थाने जग वेगाने बदलत आहे.आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व क्वांटम कम्प्युटिंगमुळे प्रगतीचा वेग हा अनाकलनीय अश्या प्रकारचा आहे. यामुळे आव्हाने आणि संधी दोन्ही आपल्या पुढे आहेत.अशाच प्रकारे नव्वदीच्या दशकात ‘डॉट कॉम’च्या बूममध्ये आपल्या भारतीय संगणक अभियंत्यांनी आपल्या कौशल्याने संपूर्ण जगाचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये योग्य पावले उचलल्यास, भारत पुन्हा एकदा आपल्या कौशल्याने जगाला व्यापू शकतो,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहे.त्यामुळे तंत्रज्ञान विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बदलत्या काळानुसार कुशल मानव संसाधन तयार करण्यात पुढाकार घ्यावा. येत्या काळात तरुण हा बदल स्वीकारतील अशी आशा व्यक्त करत, अशा प्रकारचे मानव संसाधन तयार करण्याकरिता लागणारे फ्रेमवर्क तयार करण्याचे कार्य शासन करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठे परिवर्तन सुरु आहे. उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात स्वायत्तता अतिशय महत्वपूर्ण आहे.इनोव्हेशन करायचे असेल तर ते स्वायत्ततेनेच होऊ शकते. राज्यभरात अधिकाधिक संस्थांना स्वायत्तता देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. आज ज्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार याठिकाणी करण्यात आला, त्यांनी आपल्या कार्याने केवळ सीओईपीच नाही, तर महाराष्ट्र आणि देशाला गौरव मिळवून दिला आहे.आजच्या सत्कारमूर्तींकडे बघून निश्चितच नवीन विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top