अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, तातडीची भरीव मदत द्या अन्यथा उपोषण – खासदार प्रणिती शिंदे
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, कुडल, हत्तरसंग, हत्तूर, वडकबाळ, वांगी, संजवाड आदी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची केली पाहणी

दक्षिण सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ ऑक्टोबर २०२५- दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती, घरे, रस्ते तसेच पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या औराद, कुडल, हत्तरसंग, हत्तूर, वडकबाळ, वांगी, संजवाड आदी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.

या दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची तीव्र नाराजी खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या,सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे.या रकमेने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई होणे शक्यच नाही.बँकांकडून सुरू असलेली सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
खासदार शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला की,सरकारने तातडीने भरीव आर्थिक मदतीची घोषणा केली नाही, तर मी स्वतः उपोषणास बसणार आहे.सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या,निवडणुका आल्या की बेहिशोब पैशांचे वाटप करण्यासाठी सत्ताधारी पुढे येतात पण देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र मागे हटतात.

या गावभेट दौऱ्यात माजी सभापती भीमाशंकर जमादार, प्रदेश युवक सचिव अनंत म्हेत्रे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, रावसाहेब व्हनमाने, रमेश हसापुरे, अनिल भरले, Y. S. पाटील, राहुल बिराजदार, अशोक पुजारी, सागर पाटील, संजय बगले, सिद्धारुढ घेरडी, महादेव नरुने, शंकर टाकळी, सुभाष बिराजदार, मल्लिकार्जुन रणखांबे, किरण बिदरकोटी, दराप्पा अरबळे, अस्लम शेख यांच्यासह शेतकरी बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
