पटवर्धनकुरोली शेतकरीच प्रशासन विरोध बोंबाबोंब आंदोलन करणार
पटवर्धनकुरोली आंदोलन : प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शेतकऱ्यांचा बोंबाबोंब इशारा
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धनकुरोली ता.पंढरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गावातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तलाठी अनुपस्थित,शेतकऱ्यांचे काम ठप्प
गावात नवीन तलाठी रुजू झाल्यानंतर लगेचच रजेवर गेल्याने कार्यालयात जबाबदार अधिकारी उपलब्ध नाही. त्यानंतर पदभार दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे देण्यात आला,मात्र चार्ज घेणे-देणे यावरून झालेल्या वादामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून तलाठी कार्यालय बंदच आहे.
अतिवृष्टी पंचनाम्यांवर परिणाम
या गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत पण सह्या करणारा अधिकारी हजर नसल्याने पंचनाम्यांचे काम थांबले आहे.तसेच शाळा दाखले, उत्पन्न प्रमाणपत्रे, बँक व्यवहार, शासकीय अर्ज यांसारखी सर्व कामे ठप्प आहेत.

प्रशासनावर आरोप
सर्कल मॅडम आणि मदतनीस अतिवृष्टीचे कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असले तरी अधिकृत सह्या न झाल्याने सर्व फाईल्स प्रलंबित आहेत.जबाबदार कर्मचारी ना कार्यालयात उपस्थित आहेत ना ते फोन उचलतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
शेतकऱ्यांचा इशारा –दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन
ग्रामस्थांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. जर त्यात योग्य कर्मचारी नेमला गेला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना आणि तंटामुक्त समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच राहील,असा इशारा पंढरपूर तहसिलदार सचिन लंगुटे यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे, नामदेव खेडकर, बाळासाहेब शेख, सुनील नाईकनवरे, पोपट टेके आदी मान्यवर उपस्थित होते.