आटपाडीतील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी –शासकीय संपत्ती वाचवा, आटपाडी वाचवा


सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाहीर निवेदनातून इशारा

आटपाडी वाचवा अभियान – शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवा


आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. २५ ऑक्टोबर २०२५ : आटपाडी शहरात शेकडो कोटी रुपये किंमतीच्या शासकीय आणि देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खाटीक यांनी सांगितले की, आटपाडी शहरातील मुख्य रस्ता, बाजार पटांगण परिसर, तसेच ओढा पात्रालगतच्या शासकीय जागांवर बेकायदेशीरपणे सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत.या इमारतींचे व्यवहार अधिकाऱ्यांच्या संगनमताने केले गेल्याची शंका असून, हे प्रकार प्रशासनासाठी चिंताजनक आहेत.

ओढा पात्रातील अतिक्रमण हटवा, प्रशासनाने घ्यावी कडक भूमिका
खाटीक यांनी निदर्शनास आणले की, ओढा पात्र ते धांडोर ओढा या परिसरात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखत आहेत. यामुळे पूरस्थितीची शक्यता निर्माण होते.त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केले की शासकीय संपत्तीवर झालेली सर्व अतिक्रमणे युद्ध पातळीवर नेस्तनाबुत करा. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करा, ही जनतेची अपेक्षा आहे.
५० वर्षांच्या जमिनींचे रेकॉर्ड तपासणीची मागणी

आटपाडी सिटी सर्व्हेच्या काळापासून आजपर्यंत शासकीय जमिनींवर झालेल्या व्यवहारांची रेकॉर्ड तपासणी केल्यास अनेक गैरव्यवहार उघड होतील, असेही खाटीक यांनी नमूद केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.




