कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर


कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू – भाविकांसाठी सुव्यवस्थित व्यवस्था


भाविकांना अखंड दर्शनाची संधी; मंदिर प्रशासनाचे काटेकोर नियोजन – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

लाईव्ह दर्शन व द्रुतगती रांग – कार्तिकी यात्रेत भाविकांची सोय प्राधान्याने
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 26 ऑक्टोबर 2025 : पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांसाठी 24 तास दर्शनाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शनाची सुविधा मिळावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

श्रींचा पलंग काढल्याने आता श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे मुखदर्शन 24 तास आणि पदस्पर्शदर्शन 22.15 तास भाविकांना उपलब्ध आहे. मंदिरातील पारंपरिक राजोपचारांपैकी काकडा आरती, पोशाख, धुपारती व शेजारती या सेवा बंद राहतील, तर नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील.

दि. 9 नोव्हेंबर (प्रक्षाळपूजा) पर्यंत दर्शन सुरू राहणार असून, मंदिर समितीच्या संकेतस्थळावर तसेच शहरातील एलईडी टीव्ही स्क्रीनवरून लाईव्ह दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी व्हीआयपी दर्शन व भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजांना बंद ठेवण्यात आले असून, सर्व परंपरा व प्रथांचे काटेकोर पालन केले जात आहे.

श्रींच्या पलंग काढण्याच्या विधीला मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड.माधवी निगडे,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,प्र.व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ,अतुल बक्षी व पौरोहित्य कर्मचारी उपस्थित होते.

मागील आषाढी यात्रेतील गर्दीचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कार्तिकी यात्रेचे नियोजन अधिक प्रभावी पद्धतीने करण्यात आले आहे. दर्शनरांग व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात आले असून,भाविकांच्या सोयी साठी द्रुतगती दर्शनव्यवस्था राबविण्यात येत आहे – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके






