जमिनीचे आरोग्य टिकवणे काळाची गरज – कृषीभूषण अंकुश पडवळे
फलटण येथील भव्य कृषी प्रदर्शनात सेंद्रिय व विषमुक्त शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
फलटण | ज्ञानप्रवाह न्यूज –AgricultureNews जमिनीचे आरोग्य बिघडत चालल्याने शेतीची उत्पादकता घटत असून भविष्यातील पिढीसाठी सुपीक जमीन टिकवणे हे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब OrganicFarming वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कृषी व उद्यान विद्या महाविद्यालयात आयोजित भव्य कृषी प्रदर्शनातील चर्चासत्रात ते मार्गदर्शन करत होते.यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन शरदराव रणवरे, प्रशासन प्रमुख निकम सर,प्राचार्य डॉ.चव्हाण यु.डी.,डॉ.सागर निंबाळकर, ह.भ.प.प्रतीक महाराज भोसले,जीएसटी ग्रुपचे मुकुंद धनावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अविवेकी पद्धतीने रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले असून सेंद्रिय कर्ब झपाट्याने घटत आहे, असे पडवळे यांनी सांगितले. लाखो वर्षांची जमीन केवळ दहा-पंधरा वर्षांत नष्ट करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जमिनीचे आरोग्य बिघडल्याने पिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून औषधांचा वापर वाढत आहे. परिणामी विषमुक्त अन्ननिर्मिती घटत असून मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पंजाबमधून राजस्थानकडे धावणारी कॅन्सर ट्रेन ही स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सेंद्रिय व विषमुक्त शेती उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असून शेतकऱ्यांनी या दिशेने वाटचाल केल्यास शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होईल,असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शेतकरी व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रगतशील बागायतदार सचिन गावडे,माजी सरपंच संतोष वाले,वासीम पटेल, दादासाहेब शिंदे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

बदलती जीवनशैली आणि वाढते आजार लक्षात घेता तरुण पिढीने नैसर्गिक, सेंद्रिय व विषमुक्त आहाराकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे.जमिनीचे आरोग्य बिघडल्याने शेती व मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचे कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी फलटण कृषी प्रदर्शनात मत यांनी व्यक्त केले.



