सामाजिक बोधकथा : शांततेची जबाबदारी
तो पूर्वी खूप रागावायचा.घरात काही चुकलं, काही उशीर झाला, कोणी अपेक्षेप्रमाणे वागलं नाही की त्याचा आवाज आधी उंच व्हायचा.त्याला वाटायचं,मी घराचा कर्ता आहे. माझं ऐकलं गेलंच पाहिजे.

पण हळूहळू त्याला जाणवलं की घर चालतंय… पण आनंद नाही.
सगळे काम करत होते, पण चेहऱ्यावर समाधान नव्हतं.
मुलगा अभ्यास करत होता — भीतीने.
मुलगी जबाबदारी घेत होती — दडपणाखाली.
बायको घर सांभाळत होती — पण मन हरवलेलं.
एका रात्री ऑफिसमधील एका प्रसंगानं त्याला आरसा दाखवला.तिथेही तो ओरडला होता… आणि तिथेही लोक गप्प झाले होते.
त्याला अचानक जाणवलं — गप्प बसणं म्हणजे मान्य करणं नसतं तर घाबरणं असतं.
त्या रात्री तो फार विचार करत राहिला.
पुढच्या दिवशी घरात पुन्हा तीच परिस्थिती होती.
मुलगा मोबाईलवर, अभ्यास बाजूला.
मुलीच्या कारचा अपघात झाला होता.
घर आवरलेलं नव्हतं.
पण त्या दिवशी तो ओरडला नाही.
बायकोने विचारलं,आज काही बोलणार नाही का?
तो हसत म्हणाला,कदाचित. पण आज मी स्वतःला बदलायचं ठरवलंय.
त्या एका वाक्यानं घरात काहीतरी बदलायला सुरुवात झाली.त्या रात्री सगळे शांत होते.
मुलगा स्वतःहून अभ्यासाला बसला — कारण त्याला कळालं की भविष्य त्याचं आहे.
मुलीने स्वतःच कारची दुरुस्ती ठरवली, इन्शुरन्सची कागदपत्रं समजून घेतली.
बायकोने घर नीट आवरलं — कारण तिला ते करावंसं वाटलं,भीतीपोटी नव्हे.
हळूहळू घर हलकं वाटू लागलं.
भिंतींमध्ये ओरडांचे प्रतिध्वनी उरले नाहीत.
कोणीही आता काय बोलणार? या भीतीत राहत नव्हतं.सगळे जबाबदारीनं, समजुतीनं वागत होते.
त्याला उमगलं — घरात नियमांपेक्षा नात्यांची गरज असते.नियंत्रणापेक्षा विश्वास महत्त्वाचा असतो.एक जण शांत होतो आणि बाकीचे शहाणे होतात. शांतता ही आदेशानं येत नाही तर ती उदाहरणानं येते.
बोध :
राग, हक्क आणि दबावाने माणसं वाकतात,पण समजून वागल्यानं माणसं उभी राहतात.समोरच्याला बदलायच्या आधी आपण बदललो,तर घर, समाज आणि नातेसंबंध आपोआप बदलतात



