दत्तात्रय साहेबराव भोसले कुटुंबीयांच्यावतीने सरकोलीत 4 लाखांच्या नाना-नानी पार्कचे भूमिपूजन;पर्यटन स्थळ विकासाला नवी गती
सरकोलीत नाना-नानी पार्क ची सुरुवात – ग्रामविकासाला नवी दिशा
सरकोली ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात ग्रामविकास आणि पर्यटनाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला असून, स्मृतिशेष साहेबराव नारायण भोसले व जनाबाई साहेबराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाना-नानी पार्क उभारणीच्या कामाचा शुभारंभ गुरुवार दि. 19 मार्च 2026 रोजी करण्यात आला. हा उपक्रम दत्तात्रय साहेबराव भोसले यांच्या कुटुंबीयांच्या वतीने साकारला जात असून यासाठी सुमारे 4 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

महिला व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा
या नाना-नानी पार्क मध्ये सकाळी 6 ते 7 या वेळेत महिलांसाठी योगा व व्यायामाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सरकणारे पडदे बसवण्यात येणार असून महिलांना सुरक्षित आणि स्वतंत्र वातावरण मिळणार आहे.तसेच इतर वेळेत युवकांसाठी व्यायाम व सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांसाठी गप्पा-गोष्टींसाठी हे ठिकाण खुलं राहणार आहे.

रस्ते विकासासाठी 6 कोटींची तरतूद
रांजणी ते शंकरगाव या रस्त्याचे जिल्हा मार्गात परिवर्तन करण्याचे कामासाठी मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या फंडातून 6 कोटी रुपयांची तरतूद होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सचीव सुधाकर साहेबराव भोसले यांनी मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून मंजुरी घेतली व त्यासाठी दत्तात्रय साहेबराव भोसले यांनी पाठपुरावा केला म्हणून त्यांचा सत्कार सरपंच शिवाजी आप्पा भोसले व चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन मारूती दादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

भैरवनाथ यात्रेच्या बैठकीत विकासावर चर्चा
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित श्री भैरवनाथ यात्रेच्या नियोजन बैठकीत गावातील विविध विकासात्मक विषयांवर चर्चा झाली. पर्यटन स्थळासाठी उपलब्ध शेतीवर फळबाग लागवड करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मंदिर दुरुस्ती, यात्रा आणि दिंडी सोहळ्यांसाठी निधी उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
या चर्चेदरम्यान काही मतभेद झाले असले तरी अखेर सर्वानुमते मंगल कार्यालयाची देखभाल पर्यटन स्थळ सेवेकऱ्यांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सेवेकऱ्यांचा संघर्ष आणि गावकऱ्यांचा विश्वास
2022 पासून सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी श्रमसेवेकऱ्यांनी अविरत परिश्रम घेतले आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि थंडी अशा सर्व परिस्थितीत काम करताना अनेक अडचणी, जखमा आणि आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागला.तरीही गावकऱ्यांच्या विश्वासामुळे हा प्रवास यशस्वी ठरल्याची भावना सेवेकऱ्यांनी व्यक्त केली.
सर्वांच्या सहकार्याने उभारलेले पर्यटन स्थळ
या पर्यटन स्थळाच्या उभारणीत गावकरी, लोकप्रतिनिधी, महिला भगिनी, श्रमदाते, सामाजिक संस्था, मीडिया, देणगीदार आणि प्रशासन यांचे मोलाचे योगदान आहे.एक व्यक्ती काहीही करू शकत नाही,सर्वांच्या सहकार्यानेच विकास शक्य आहे,असे सेवेकऱ्यांनी नमूद केले.
पर्यटन स्थळ विशेष अंकासाठी आवाहन
श्री भैरवनाथ यात्रा व पर्यटन स्थळ विशेष अंक 2026 साठी जाहिरातींचे आवाहन करण्यात आले आहे. या निधीतून वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण व पर्यटन स्थळ देखभाल करण्यात येणार आहे.
सरकोली गावात उभारण्यात येणारे ‘नाना-नानी पार्क’ आणि इतर विकासकामे ही ग्रामविकास, पर्यटन आणि सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण ठरत आहेत. गावकऱ्यांच्या एकजुटीने सरकोलीला देशातील आदर्श पर्यटन गाव बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.





