जर्मनीत मर्केल यांचा पक्ष पराभवाच्या छायेत; मध्यममार्गी डाव्यांची सरशी!
मध्यमार्गी-डाव्या विचारांकडे कल असलेल्या सोशल डेमोक्रेटिक (एसपीडी) पक्षाला २५.५ टक्के मते मिळाली आहेत. तर, मर्केल यांच्या सीडीयू/सीएसयू कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या आघाडीलाा २४.५ टक्के मते मिळाली आहेत. तर, ग्रीन पक्ष हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ग्रीन पक्षाला १४.८ टक्के मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत या पक्षाची कामगिरी दमदार राहिली आहे. उदारमतवादी एफडीपी पक्षाला ११.५ टक्के, उजव्या विचारांच्या एएफडी पक्षाला १०.३ टक्के मते मिळाली आहेत. डाव्या विचारांच्या ‘लेफ्ट’ पक्षाला ४.९ टक्के मते मिळाली आहेत.
एसडीपी, ग्रीन पक्ष आणि डाव्यांनी सत्ता स्थापन केल्यास दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत अधिक डावा वैचारिक कल असलेले सरकार स्थापन होईल. ही आघाडी करण्यासाठी एसपीडीला पर्यावरण संरक्षण आणि जनकल्याण कार्यक्रमांच्या ग्रीन पक्षाच्या आणि डाव्या पक्षाच्या अजेंड्यावर सहमत व्हावे लागणार आहे.
मार्केल यांच्यानंतर सत्ता सांभाळणाऱ्यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. करोना काळात घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे आव्हान असणार आहे. त्याशिवाय पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाचाही मुद्दा या निवडणुकीत ठळकपणे समोर आला होता.