आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होऊ देणार नाही;सातत्याने पाठपुरावा करणार–आमदार सत्यजीत तांबे
नाशिक विभागातील संस्थाचालकांच्या बैठकीत अनुदानित आश्रम शाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय व शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर आढावा
शिरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ मे २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न अत्यंत संवेदनशील आहेत.अनुदानित आदिवासी आश्रमशाळा अनेक दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करत आहेत.सरकारची धोरणे आणि निर्णय प्रक्रियेमुळे या शाळांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.या पार्श्वभूमीवर संस्थाचालकांनी मांडलेले प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात शासना समोर ठामपणे मांडले जातील,असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्था आयोजित नाशिक विभागातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांची बैठक उत्साहात पार पडली. किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर येथे झालेल्या या बैठकीस राज्यभरातील संस्था चालक, पदाधिकारी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सत्यजीत तांबे यांनी सहभाग घेत आश्रमशाळांसमोरील विविध प्रशासकीय, आर्थिक व शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या विविध आदेशांमुळे अनुदानित आश्रमशाळा चालविताना येणाऱ्या अडचणी, निधी वितरणातील समस्या, शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक सुविधा तसेच संस्थांच्या दैनंदिन कामकाजातील अडथळे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी त्यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आश्रमशाळांना सक्षम करण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा वेध घेण्यासाठी आणि शिक्षण प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस माजी खासदार बापू चौरे, नाशिक जिल्हाध्यक्ष शिवराम झोले, धुळे जिल्हाध्यक्ष पोपटराव सोनवणे,नंदुरबार सरचिटणीस युवराज पाटील,नागपूर सरचिटणीस राजेंद्र सरोदे, आयोजक तुषार रंधे तसेच डॉ. शशिकांत वाणी यांच्यासह नाशिक विभागातील विविध संस्था प्रमुख उपस्थित होते.

