Himachal Pradesh: ‘खंमीगर ग्लेशिअर’मध्ये अडकून पडलेल्या ट्रेकर्सची अखेर सुटका
हायलाइट्स:
- दोन मृतदेहांसहीत आयटीबीपी जवानांचा २७ किलोमीटर पायी प्रवास
- मृतदेह काझा प्रशासनाच्या ताब्यात सोपवले
- थंडीत गारठून दोघ ट्रेकर्सनं आपले जीव गमावले, तर १४ जण अडकून पडले होते
आयटीबीपी जवानांनी दोन्ही मृतदेह काझा प्रशासनाकडे सोपवले आहेत. तर रेस्क्यू करण्यात आलेल्या चार पोर्टरना काझाच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
आयटीबीपीच्या १७ व्या बटालियनच्या जवानांनी हे मृतदेह खंमीगर ग्लेशिअर जवळच्या भागातून ताब्यात घेतले. या भागात हेलिकॉप्टर पोहचण्याची सुविधा नसल्यानं स्ट्रेचरवर हे मृतदेह बांधून तब्बल २७ किलोमीटरचा प्रवास जवानांनी पायी केला.
‘इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन, पश्चिम बंगाल’चा सहा सदस्यीय गट ‘बातल’हून – ‘खंमीगर ग्लेशिअर’ – ‘काजा’ या मार्गावर ट्रेकिंगसाठी रवाना झाला होता. खंमीगर ग्लेशिअर जमिनीपासून जवळपास ५०३४ मीटर उंचीवर आहे. या दलासोबत ११ पोर्टर (सामान उचलण्यासाठी आणि मदतीसाठी माणसं) आणि एक स्थानिक गाईड (शेरपा) हेदेखील सहभागी झाले होते. परंतु, अचानक मोठी बर्फवृष्टी झाल्यानंतर हे सगळे जण खंमीगर ग्लेशिअर भागात अडकून पडले होते. प्रचंड थंडीत निभाव न लागल्यानं पश्चिम बंगालचे रहिवासी भास्कर देव (६१ वर्ष) आणि संदीप कुमार ठाकुरता (३८ वर्ष) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या ट्रेकिंग गटातील एका ट्रेकरनं एका पोर्टरसोबत ‘काजा’ गाठून या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर या टीमच्या मदतीसाठी तातडीनं आयटीबीपी, भारतीय लष्कर आणि नागरी प्रशासनाची एक संयुक्त टीम २८ सप्टेंबर रोजी काझाहून रवाना झाली होती.