आ.शरद रणपिसे यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील सुपुत्र महाराष्ट्राने गमावला – डॉ.नीलम गोऱ्हे विधानपरिषद उपसभापती
आ.शरद रणपिसे यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील सुपुत्र महाराष्ट्राने गमावला – डॉ.नीलम गोऱ्हे विधानपरिषद उपसभापती

पुणे /डॉ अंकिता सिध्दार्थ शहा : महाराष्ट्राने आ. शरद रणपिसे यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील सुपुत्र गमावल्याची भावना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली तसेच श्री रणपिसे यांच्या नावाने वाचनालय उभारण्यात यावे असे देखील त्यांनी यावेळी सुचवले.विधानपरिषदेतील काँग्रेसचे जेष्ठ सदस्य आमदार शरद रणपिसे यांचे दुःखद निधन दि.२३ सप्टेंबर, २०२१ रोजी झाले. त्यांच्या पुण्यानुमोदन सभेचे आयोजन पुणे येथील अल्पबचत भवन केले होते.
यावेळी भावना व्यक्त करताना डॉ.गोऱ्हे यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्या म्हणाल्या की, विधीमंडळाच्या विविध दौऱ्यात आ.रणपिसे यांच्यासमवेत जाण्याचा योग आला.ते ज्याठिकाणी जात तेथे अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे त्यांचे लक्ष असायचेच ,पण जो प्रश्न ते अधिकाऱ्यांना विचारत त्याच अनुषंगाने तो प्रश्न दुसऱ्या कोणाला विचारून त्यातील सत्यता जाणून घेत असत. या सगळ्यामधून त्यांची चौकस बुद्धी, अभ्यासवृत्ती प्रत्येक ठिकाणी दिसत असे .
सभागृहात भाषण करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबतीत विविध विषयावर भाषण करताना त्यांचे संदर्भ देणे,संपूर्णपणे त्यांचा आदर्श ठेवणे.सगळ्या सामाजिक चळवळीच्या संदर्भामध्ये तळागाळातल्या लोकांची त्यांचे नातं जोडलेलं होते.उपसभापती निवडणुकीच्या वेळीदेखील श्री रणपिसे यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. तसेच त्यांचे खूप मोलाचे सहकार्य देखील मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री रणपिसे आजारी होते, प्रकृती गंभीर असल्याचे समजले त्यावेळी भेटण्यासाठी जाणार त्याचवेळी त्यांचे निधनाचे वृत्त मिळाले आणि मनाला धक्का बसला.अजूनसुद्धा श्री रणपिसे आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. विधिमंडळामध्ये ते ज्या जागेवर बसत होते त्या जागेकडे पाहिलं की आम्हाला त्यांची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही अशी भावना देखील डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे रणपिसे यांच्याकडे कायम लक्ष असायचे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण लक्षपूर्वक ऐकत असत असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ.गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने त्यांना अभिवादन केले.