नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव अजूनही सुरूच आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या (
FIH) सर्व पुरस्कारांवर भारतीय महिला आणि पुरुष संघांतील खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या झोळीत ८ पुरस्कार पडले आहेत. भारतीय पुरुष संघाने ४१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले. तसेच महिला संघानेही उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला. भारताने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपर, या वर्षातील उदयोन्मुख खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक हे पुरस्कार पटकावले आहेत. पुरस्कारांमध्ये भारताने जगभरातील सर्व देशांना क्लीन स्वीप केले आहे.
नॅशनल असोसिएशन, फॅन्स आणि मीडिया या तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये या पुरस्कारांसाठी मतदान केले जाते. भारताच्या विजेत्या खेळाडूंनी तिन्ही प्रकारात अव्वल स्थान मिळवले आहे. जगभरात ७९ राष्ट्रीय संघटना आहेत, ज्यांचे प्रशिक्षक आणि कर्णधार त्यांचे प्रतिनिधित्व करतात. असोसिएशनने आशियाईमध्ये ३३ पैकी २९, आफ्रिकेत २५ पैकी ११, युरोपमधील ४२ पैकी १९, ओशनियामधील ८ पैकी तीन आणि पॅन अमेरिकेत ३० पैकी १७ जणांनी मतदान केले होते. त्याच वेळी, ३० हजार विक्रमी संख्येत चाहत्यांनी मतदान केले. ग्राहम रीड हे अजूनही भारतीय संघाचा भाग आहेत. तर शोर्ड मॅरीज्ने यांचा कार्यकाळ टोकियो ऑलिम्पिक नंतर संपला आहे.
पुरस्कार विजेत्याची नावे पुढीलप्रमाणे –
महिला –
सर्वोत्कृष्ट खेळाडू – गुरजीत कौर
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – सविता पुनिया
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – शर्मिला देवी
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक – शोर्ड मॅरिज्ने
पुरुष –
सर्वोत्कृष्ट खेळाडू – हरमनप्रीत सिंग
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – पी.आर. श्रीजेश
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू – विवेक प्रसाद
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक – ग्राहम रीड
बेल्जियमने नाराजी केली व्यक्त
एफआयएचचे सर्व पुरस्कार जिंकत भारताने जगभरातील सर्वच देशांना भारताने क्लीन स्वीप दिला आहे. हा क्लीन स्वीप बेल्जियम संघाला पचवता आला नाही. त्याविरोधात त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. बेल्जियमच्या हॉकी संघाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘हॉकी बेल्जियम एफआयएच पुरस्कारांच्या निकालांमुळे खूप नाराज आहे. सुवर्ण जिंकणाऱ्या आमच्या संघाला प्रत्येक वर्गात नामांकन मिळाले असले तरी एकही पुरस्कार मिळाला नाही. हे मतदान यंत्रणेतील अपयश दर्शवते. आम्ही एफआयएच बरोबर काम करू आणि भविष्यासाठी चांगल्या प्रणाली तयार करू.’