समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोडसाळ आणि चुकीचे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
     मुंबई , दि.25/10/2021 - समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत . नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्याबाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे.समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबावावं आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. समीर वानखडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे.समीर वानखडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

आर्यनखान यांच्या विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत.त्यामुळे न्यायालयात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तात्काळ आर्यनखानला जामीन दिला असता . याबाबत समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे.समीर वानखेडे यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग करीत आहे . तेच काम समीर वानखेडे करीत आहेत. युवा पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून उलट अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या केसाला ही धक्का लागला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ना.रामदास आठवले यांनी दिला आहे. 

समीर वानखेडे हे IRS नार्कोटिकस कंट्रोल ब्युरो (NCB) या सेलचे प्रमुख अधिकारी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले आहे. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर यापूर्वी समिर वानखडे यांनी कारवाई केली असल्यामुळे त्याचा राग मनात धरून समीर वानखेडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांनी केलेला आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार करीत आहे – ना.रामदास आठवले

  अशा प्रकाराचा एखादा गंभीर निर्णय घेणे हा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेली सामूहिक प्रक्रिया आहे .नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. त्या निर्णयासाठी फक्त समीर वानखेडे या मागास वर्गीय अधिकाऱ्याला जबाबदार धरणं चुकीचं आहे .त्यांच्यावर असे आघात होणार असतील तर आम्ही समीर वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे ना.रामदास आठवले म्हणाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: