यात्रा कालावधीत स्वच्छतेला व भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे-परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

यात्रा कालावधीत स्वच्छतेला व भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे-परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट स्वच्छतेसाठी जास्तीचे स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा – शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२५ – कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे तसेच मंदिर समितीने भाविकांना आवश्यक सुविधांबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन देण्याचे नियोजन करावे,अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस शिक्षणमंत्री दादा भुसे,आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे,एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी,मंदीर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर,ह.भ.प राणा महाराज वासकर तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की,आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाने वारकरी भाविकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचप्रमाणे कार्तिक यात्रेतही चांगल्या सुविधा द्याव्यात. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र व वाळवंटातील स्वच्छतेची दक्षता घेऊन त्यासाठी जास्तीचे स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. भाविकांना पायी चालत असताना कचखडी टोचणार नाहीत याची दक्षता घेऊन भक्तीसागर 65 एकर येथे मुरूम खडी टाकल्यानंतर तात्काळ रोलिंग करून घ्यावे,विशेषताः प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात दिंड्याबरोबर वारकरी भाविक अनवाणी चालत प्रदक्षिणा घालतात यावेळी त्यांच्या पायांना कचखडी टोचणार नाहीत याची दक्षता घ्यावी,असे निर्देश दिले.

दिंडी सोहळ्यांनी प्रथा परंपरेप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण करावी. लाऊड स्पीकर वापर करू नये. लाऊड स्पीकरचा वापर केल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाने कारवाई करावी.कार्तिकी यात्रा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिंड्या पंढरपूरहुन आळंदीकडे रवाना होतात या दिंड्यांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने मार्गावर सुरक्षा व्यवस्था देण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी 1050 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून सर्व बसेस सुस्थितीत ठेवाव्यात.पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तात्काळ बुजवावेत.पंढरपूर शहरातील खड्डे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ बुजवावेत अशा सूचनाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा-शिक्षणमंत्री दादा भुसे

कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेच्यावेळी ज्याप्रमाणे दर्शन रांगेतील भाविकाला सपत्नीक पूजेचा मान दिला जातो.त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्यावेळी मान मिळावा असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, कार्तिकी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला येतात. भाविकांना स्वच्छ पिण्याचे,पाणी सुलभ शौचालय,मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध ठेवावा.वारकरी भाविकांना सुलभ व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.पाटबंधारे विभागाने नदीपात्रा तील पाणी पातळी नियंत्रित राहील याची दक्षता घ्यावी.नगरपालिका प्रशासनाने वाळवंटात तात्पुरते शौचालय,स्वच्छता, प्रखर प्रकाशव्यवस्था आदी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.चंद्रभागा वाळवंट कायमस्वरूपी स्वच्छ राहील याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येणार असल्याचेही शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.

यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले की,यात्रा कालावधीत दर्शन रांगेत पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. वीज वितरण कंपनीने अखंडित वीजपुरवठा करावा, शहरातील सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवावेत.गर्दी नियंत्रणासाठी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करावा.आवश्यक ठिकाणी माहिती फलक लावावे,बस स्थानकात स्वच्छता ठेवावी अशा सूचना मांडल्या.

आमदार अभिजीत पाटील यांनी कार्तिकी यात्रा कालावधी मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो.त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवावेत.अन्न औषध प्रशासनाने कारवाई बरोबरच स्वच्छतेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात असे सांगितले.

यावेळी ह.भ.प.जळगावकर महाराज व ह.भ.प राणा महाराज वासकर यांनी प्रदक्षिणा मार्गावर कचखडी नसावी, चंद्रभागा वाळवंट स्वच्छ राहावे तसेच कार्तिक वारी झाल्या नंतर दिंड्या आळंदीकडे जात असतात.यावेळी दिंड्यांना सर्व आवश्यक सुविधा व सुरक्षा उपलब्ध व्हाव्यात.प्रदक्षिणा मार्गावर दिंड्यामध्ये स्पीकरचा वापर केला जातो तो वापर होऊ नये अशी मागणी केली.

एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्दी नियंत्रण ठेवा – आमदार आवताडे

स्वच्छ व सुरक्षित कार्तिकी यात्रा घडविण्यासाठी आमदार अभिजीत पाटील व संत मंडळींचा पुढाकार

कचखडीमुक्त प्रदक्षिणा मार्ग आणि अखंड वीजपुरवठा – यात्रेच्या योजनेला गती

Leave a Reply

Back To Top