जामखेड सभेतील अवमान प्रकरण विधानपरिषदेत गाजले; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलिस चौकशीचे आदेश
विधानपरिषद, सभापती आणि घटनात्मक पदांचा अवमान? जामखेड प्रकरणावर कठोर भूमिकेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
नागपूर,दि.०९ डिसेंबर २०२५- अहिल्यानगरातील जामखेड येथे २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांच्या प्रचारसभेत पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांच्याकडून विधानपरिषद आणि सभापती पदाबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आले. या वक्तव्याने सभागृहाचा सन्मान, परंपरा आणि घटनात्मक पदांची प्रतिष्ठा धोक्यात आली असून याचा मुद्दा आज विधानपरिषदेत जोरदारपणे मांडला गेला.

यावेळी आ.प्रवीण दरेकर व आ.श्रीकांत भारतीय यांनी या वक्तव्याला सभागृहाचा अवमान म्हणत विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी म्हटले की,अशा प्रकारच्या विधानांनी जनमानसात विधानपरिषदेबद्दल चुकीची प्रतिमा तयार होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या मुद्द्याची दखल घेत मोरे यांच्या भाषणाला अवमानकारक,दिशाभूल करणारे आणि सभागृहाची प्रतिमा काळवंडणारे असे संबोधले.त्यांनी स्पष्ट केले की या वक्तव्यांमुळे सभागृहाचा आणि घटनात्मक पदांचा अपमान झाला असून हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.
मोरे यांनी केलेली विधानं —कार्पेटचा लाल रंग म्हणजे दुष्काळाचे प्रतीक, विधान परिषदेत फक्त ७०–७५ सदस्य बसतात, सभापती कायदेपंडित नाहीत या विधानांवर सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने नाराजी व्यक्त केली.

निर्णय देताना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या फक्त विशेषाधिकारभंगाची शिक्षा अपुरी आहे. संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे.
त्यांनी पोलिसांना तात्काळ चौकशीचे आदेश देत आवश्यक त्या कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले. हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी सभागृहाचा सन्मान राखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. उपसभापतींनीही सदस्यांनी पक्षीय सीमांच्या पलीकडे एकत्र येऊन घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि विधान परिषद ही राज्याची घटनात्मक व गौरवशाली संस्था असल्याचे नमूद केले.

