महिला हक्क,सामाजिक प्रश्न आणि न्यायव्यवस्थेवर डॉ.नीलम गोऱ्हे यांची स्पष्ट भूमिका;संधी मिळाली तर समाजहित हीच प्राथमिकता

महिला हक्क,सामाजिक प्रश्न आणि न्यायव्यवस्थेवर डॉ.नीलम गोऱ्हे यांची स्पष्ट भूमिका;संधी मिळाली तर समाजहित हीच प्राथमिकता

सुयोग येथे पत्रकारांशी मुक्तसंवाद; महिला-सुरक्षा,सायबर गुन्हे आणि सामाजिक बदलांवर डॉ.गोऱ्हे यांची सखोल चर्चा

नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज | दि.१० डिसेंबर २०२५-विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सुयोग विश्रामगृहातील पत्रकार निवासस्थानी भेट देत पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. महिला संरक्षण, सामाजिक प्रश्न, न्यायप्रक्रियेतील अडचणी,वाढते गुन्हे तसेच आपल्या सार्वजनिक प्रवासातील अनुभव याविषयी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

महिलांवरील अत्याचार,घरगुती हिंसा, सायबर गुन्हे, अल्पवयीन मुलींचे प्रश्न, ऊसतोड मजुरांचे हाल अशा विविध विषयांवर बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक प्रकरणात योग्य माहिती घेऊनच निर्णयाचे निर्देश देण्याचा मी प्रयत्न करते. अल्पवयीन मुलींना निर्णयक्षम वयात पोहोचल्यावर शिक्षण,आश्रय,विवाह किंवा स्वतःच्या निवडीसाठी पर्याय खुले ठेवणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फलटण येथील वैद्यकीय शिक्षिका आत्महत्येप्रकरणी त्यांनी हातावर लिहून ठेवलेल्या संदेशाचा उल्लेख करताना, समाजातील भावनिक व मानसिक दबावाचे गांभीर्य अधोरेखित केले. अशा घटना महिलांवरील पूर्वग्रह आणि संवेदनाहीनतेचे चित्र दाखवतात.समाज व यंत्रणा अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे,असे त्या म्हणाल्या.

आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की,सामाजिक कामातून सुरुवात करून शिवसेनेतील जबाबदाऱ्या, 2002 मध्ये विधानपरिषद सदस्यत्व, तसेच 2020 मध्ये उपसभापतीपद – या वाटचालीत समाजहित हेच ध्येय कायम राहिले.माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने आणि सभागृहाने संधी दिली; त्या संधींचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करणे हेच माझे ध्येय आहे,असे त्यांनी ठामपणे सांगितले.

महिलांवरील गुन्ह्यांच्या वाढत्या आकडेवारीबाबत बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,नोंदी वाढत असल्या तरी त्यामागे जागरूकता,शहरीकरण, स्थलांतर आणि बदलती सामाजिक रचना यांचेही कारण आहे.

या संवादासाठी विधिमंडळ मान्यताप्राप्त पत्रकारांसह विविध माध्यमांतील वरिष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top