शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

मनसेच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० एप्रिल २०२४: पुण्यातील कोथरूड,वडगाव, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, श्रद्धा शिंदे, श्रुती नाझीरकर, विद्या शिंदे, निलेश गिरमे, लक्ष्मण आरडे आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत आहे. आतापर्यंत आमचा प्रवास तीन चाकीत सुरू होता मात्र मनसेने आम्हाला पाठबळ दिल्याने आता तो चार चाकी झाला आहे.यामुळे निवडणुकीत ताकद आणखीन वाढली आहे. मनसे सोबत आल्याने त्यांचे स्वागत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील धुरळा खाली बसून चित्र स्पष्ट होत आहे. लोकांचा उत्साह वाढत असून ही निवडणूक विकास विरुद्ध विद्वेषाचं राजकारण अशी आहे. शिवसेनेने सर्वसमावेशक भूमिका घेतली असून नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. सबका साथ सबका विश्वास हे धोरण आमचे असून जाहीरनाम्यात त्याचा प्रत्यय दिसून येईल असे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

उद्या दि.११ एप्रिल रोजी महायुतीचा पुण्यातील पहिला मेळावा बालगंधर्व रंगमंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सासवड येथे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभा घेणार आहेत अशी माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *