दोन वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी भोसे ता.पंढरपूर येथे आमरण उपोषणाचा इशारा

भोसे ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मागील दोन वर्षापासून भोसे ता.पंढरपूर येथील प्रमुख असलेल्या प्राथमिक शाळांचे बांधकाम रखडलेले आहे.या ठिकाणी असणाऱ्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम गेली दोन वर्ष अर्धवट अवस्थेत आहे. दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात भेटूनसुद्धा हे काम सुरू केलेले नाही.याउलट प्रशासनाकडून त्याचे पैसे (बील)सुद्धा उचललेले आहेत असे समजते.

या ठिकाणचे विद्यार्थी उन्हात , पावसात , बाहेर झाडाखाली , शेडनेटमध्ये बसतात. पण प्रशासनाला किमान शाळकरी मुलांची तरी काळजी असायला हवी होती.त्यामुळे जि.प. प्राथमिक शाळा,दिवाण मळा व जि.प. प्राथमिक शाळा, रानमळा भोसे ता.पंढरपूर जि.सोलापूर येथील काम त्वरित पूर्ण करावे.

तसेच दिवाण मळा पाणीपुरवठा योजना भोसे ही कागदावरच असलेली अनेक वर्षापासून बंद असलेली पाणीपुरवठा योजना ( कागदावरच सुरू असलेली योजना ) त्वरित सुरू करावी. नागरिकांकडून याची पाणीपट्टी देखील वसूल केली जाते. या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्तीची सुद्धा बिले काढलेली आहेत. ज्यांच्यासाठी लाखो रुपये शासनाने खर्च केले तेथील एकाही घराला कधीही या पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे ही योजना त्वरित सुरू करावी आणि प्रत्येकाच्या दारात नळ काढावा असे स्वराज्य चे जिल्हाध्यक्ष प्रा. महादेव तळेकर यांनी सांगितले.

त्यामुळे दोन्ही शाळांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा योजना सुरू करेपर्यंत मी व माझे सर्वपक्षीय सहकारी व भोसे ग्रामस्थ महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2024 पासून दिवाण मळा पाणीपुरवठा पाणी टाकी भवानी माता मंदिराच्या समोर भोसे येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा स्वराज्य चे जिल्हाध्यक्ष प्रा.महादेव तळेकर यांनी दिला आहे.