मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण…; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरुन शरद पवारांचा टोला


मुंबईः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असं विधान केलं होतं. या विधानावरुन राज्यात महाविकास आघाडीकडून अनेक प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लखीमपुर हिंसाचार, अनिल देशमुख, एनसीबी कारवाई यावर भाष्य केलं. तसंच, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरुनही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांनी केलेले एक विधान मी ऐकलं. मी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. पाच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर आपण अजूनही सत्तेत नाहोत याचा त्यांना विश्वास नाही. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण हे माझ्याही लक्षात नव्हतं, ही माझी कमतरता आहे,’ असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. तसंच, ‘सत्ता गेल्याची वेदना किती खोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो,’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

वाचाः मावळ घटनेला भाजप जबाबदार, लोकांच्या हे लक्षातही आलं: पवार

लखीमपूरच्या प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मावळच्या घटनेचा संदर्भ देत टीका केली होती. यावरुन शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मावळामध्ये काय घडलं असा प्रश्न केला होता. एका दृष्टीने त्यांनी सांगितलं ते बरं केलं. कारण त्यावेळी तिथे काय घडलं हे कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही. तेव्हा शेतकरी मृत्यूमुखी पडले, त्याला जबाबादार कुणी राजकीय नेते व पक्ष नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. त्यांनी कारवाई केली नाही. त्याला बराच काळ होऊन गेला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांनी लखीमपूर आणि मावळ याची तुलना केली. आता मावळबद्दलचं चित्र पूर्वीपेक्षा फार स्पष्ट झालं आहे,’ अस पवारांनी म्हटलं आहे.

‘मावळचा गोळीबाराचा उल्लेख माजी मुख्यमंत्र्यांनी केला त्याच मावळामध्ये लोकांना भडकवण्याचे काम कोणी केलं हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर मावळमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ९० हजारांच्या फरकाने निवडून आले,’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: