श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ ऑगस्ट २०२५- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भक्तिभावाने व उत्साहात झाले.परंपरेचा सन्मान राखत सहकुटुंब विधिवत पूजन करून गणरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर मंगल आरती करण्यात आली.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले,गणराया सर्वांचे जीवन आनंदी करो. सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येकाला सुख-समृद्धी लाभो,अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

तर खासदार प्रणिती शिंदे यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना सांगितले,महिला, शेतकरी,दिनदलीत, वंचित व सर्वांच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण होऊ देत.लोकशाही आणि लोकांचा आवाज अधिक खंबीर होऊ दे, सोलापूरसह महाराष्ट्र व देशावरचे संकटे दूर होऊ देत.नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याला नव्या उभारीसह चेतना मिळू दे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता, एकोपा, सामाजिक सलोखा नांदावा आणि देशाच्या प्रगतीला गती मिळावी असे सांगून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेसह सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
