पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे,दि.११ ऑगस्ट २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले.या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
जखमींना खेड तालुक्यातील आणि परिसरातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते.या महिला यावेळी अतिशय भक्तीमध्ये दंग होऊन देवाची गाणी म्हणत कुंडेश्वर मंदिर दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.

विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, दर्शनाच्या पवित्र हेतूने निघालेल्या भगिनींवर मृत्यूचा आघात होणे अत्यंत वेदनादायी आहे. या क्षणी राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे.
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला तातडीने मृत व जखमींची संपूर्ण यादी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले जेणेकरून नातेवाईकांना माहिती मिळेल.पोलीस, वैद्यकीय पथक आणि स्थानिक मदतगट घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.